24 November 2017

News Flash

छुपा अजेंडा उघड

विधायक कामासाठी झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचे अनेक दाखले देता येतील. विद्यापीठाची शुल्कवाढही एकेकाळी विद्यार्थी आंदोलनाने

रेश्मा शिवडेकर, मुंबई | Updated: January 18, 2013 12:11 PM

विधायक कामासाठी झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचे अनेक दाखले देता येतील. विद्यापीठाची शुल्कवाढही एकेकाळी विद्यार्थी आंदोलनाने हाणून पाडली होती. पण, आता हे प्रभावी शस्त्र उठसूठ कोणत्याही (अनेकदा चुकीच्याही) कारणासाठी विद्यार्थ्यांकडून वापरले जाऊ लागले आहे. ‘सांस्कृतिक महोत्सवा’च्या निमित्ताने रात्री उशीरा डीजेवर नाचू दिले नाही, म्हणून मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील ‘अल्केश दिनेश मोदी वित्तीय व व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थे’च्या सुमारे ९० विद्यार्थ्यांनी गुरुवारी उपसलेले आंदोलनाचे हत्यारही याच प्रकारातले.
१४ जानेवारीला सुरू झालेला हा सांस्कृतिक महोत्सव १६ जानेवारीला (बुधवारी) रात्री संपला. बक्षीस समारंभाने महोत्सवाची सांगता होणार होती. पण सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर बक्षीस समारंभ सुरूच व्हायला रात्रीचे साडेनऊ झाले. हा कार्यक्रम सव्वादहाच्या सुमारास संपला. त्यानंतर मुलांना दिवसभर केलेल्या कामाचा ‘श्रमपरिहार’ डीजेच्या संगीतावर नाचून करायचा होता. आधीच बराच उशीर झाल्याने संस्थेच्या संचालक आणि शिक्षकांनी आता ‘डीजे नको’ म्हणत  मुलांना कार्यक्रम आटोपता घेण्यास सांगितले. ध्वनिप्रदूषणविषयक नियमांचा भंग होण्याबरोबरच विद्यापीठाच्या संकुलातच इतक्या उशीरापर्यंत डीजे चालू ठेवणे संयुक्तिक ठरले नसते, हा विचार त्यामागे होता. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये १८-१९ या अजाणत्या वयोगटातील जवळपास ८०-९० मुलीही होत्या. यापैकी काही मुली कल्याण, ठाणे, विरार अशा दूरवर राहणाऱ्या होत्या. मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही उशीरापर्यंत कार्यक्रम चालू ठेवणे शक्य नसल्याने संचालकांनी परवानगी दिली नाही, असे संस्थेतील एका शिक्षकाने सांगितले. दिल्ली आणि चेतना महाविद्यालयातील प्रकारानंतर आम्ही विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत अधिकच दक्ष झालो आहोत, असे या शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मात्र, काही विद्यार्थ्यांनी संचालकांसमोरच नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना स्पष्ट शब्दात सुनावल्यानंतर संचालक तेथून निघून गेले. पण, काही मुलांनी त्यानंतरही विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. काही विद्यार्थ्यांनी मद्यपान केल्याचा संशय आल्याने सुरक्षा रक्षक त्यांना पिटाळून लावण्याच्या प्रयत्नात होते. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच हा प्रकार सुरू असल्याने शेवटी गस्तीवर असलेल्या पोलिसांनाच हस्तक्षेप करून हा तिढा सोडवावा लागला. या प्रकारामुळे दुखावलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी या गोष्टीचा वचपा संचालकांच्या विरोधात आंदोलन छेडून काढला. ‘संचालक हटाव’ नावाचे फलक घेऊन दुपापर्यंत विद्यार्थी आंदोलन करत होते. या बाबत संस्थेचे संचालक डॉ. सतीश रत्नपारखी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन हा संस्थेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

First Published on January 18, 2013 12:11 pm

Web Title: secret agenda opened