आयआरबी कंपनीच्या टोल वसुलीच्या इराद्याला धक्का देत शिवसेनेने रविवारी मध्यरात्री शहरातील तीन नाके पेटवून दिले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करताना शिवसैनिकांनी टोल नाक्याच्या केबीनच्या साहित्याची प्रचंड नासधूस केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पेटविण्यात आलेल्या टोल नाक्यांमध्ये शाहू नाका, फुलेवाडी व कसबा बावडा येथील नाक्यांचा समावेश आहे. टोल आकारणी विरोधी आंदोलनास हिंसक वळण लागल्याचे या आंदोलनातून दिसून आले. मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या दोनदिवसीय कोल्हापूर दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या आंदोलनाला राजकीय किनार आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे.    
कोल्हापूर शहरात रस्तेविकासाचे काम आयआरबी कंपनीने केले आहे. २२० कोटी रुपये खर्च करून हे काम करण्यात आले आहे. मात्र रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याने याविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. शासनाच्या मदतीने आयआरबी कंपनीने शहरातून बाहेर जाणारे व शहरातून आत येणाऱ्या मार्गावर टोल आकारणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. टोलविरोधी कृती समितीच्या माध्यमातून या सर्व प्रयत्नांना प्रखर विरोध केला जात आहे. शिवसेनेने टोल आकारणीस विरोध दर्शविला आहे. विरोध दर्शविण्यासाठी शिवसेनेने टोल नाके पेटवून दिले आहेत.    
रविवारी मध्यरात्रीनंतर सुमारे ५० आंदोलक दुचाकीवरून टोल नाक्यांकडे रवाना झाले. तत्पूर्वी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना आंदोलन करणार असल्याची माहिती दिली होती. मात्र टोल नाके पेटविणार असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले नव्हते. टोल नाक्यांवर पोहोचल्यावर आंदोलकांनी टोल वसुलीसाठी बसविण्यात आलेल्या केबीन्सना लक्ष्य केले. त्यांच्या काचा फोडून फर्निचरची नासधूस करण्यात आली. त्यानंतर या केबीन पेटवून देण्यात आल्या. प्लॅस्टिकच्या कागदाने झाकण्यात आलेल्या केबीन्सना आग लागल्यावर आगीचे व धुराचे उंच लोट दूरवरूनही दिसत होते.     
शाहू नाका, फुलेवाडी व कसबा बावडा या तीन ठिकाणी पेट्रोल ओतून टोल नाक्यांच्या केबीन्स पेटवून देण्यात आल्या. केबीनचे आच्छादन व वायर आगीत जळून खाक झाल्या. घटनेची माहिती कळाल्यानंतर अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी तातडीने रवाना झाले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.     दरम्यान, टोलनाके पेटवण्याच्या प्रकाराची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी टोलची टोलवाटोलवी थांबवावी, अन्यथा पुढील आंदोलनास शासन जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे. आठ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टोल थांबवावा अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देणारे निवेदन दिले होते. त्याची दखल न घेतल्याने, लोकभावनेचा आदर न केल्याने अशा प्रकारे संतप्त लोकभावनेचा उद्रेक झाला आहे, असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. संपूर्ण राज्यातील टोलचे भूत गाडण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन सुरू राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. निकृष्ट काम करणाऱ्या आयआरबी कंपनीला शासनाने पाठीशी घालू नये, कोल्हापूरच्या जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या या प्रकल्पाविरुद्ध शिवसेना अखेपर्यंत लढा देईल असेही त्यांनी नमूद केले. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर हे आंदोलन आहे का असे विचारता त्याचा इन्कार करून क्षीरसागर यांनी कोणाच्या दौऱ्यामुळे आंदोलन करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे सांगून आगामी निवडणुकीत शिवसेनेचे सहा आमदार, दोन खासदार निवडून आणू, असे राजकीय भाष्य केले.