सेट-नेटबाधित शिक्षकांचा प्रश्न सोडविण्यात राज्य सरकारला आलेल्या अपयशाच्या पाश्र्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांना प्राध्यापक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. गिरगाव चौपाटीनजीकच्या हजारीमल सोमाणी महाविद्यालयात गुरुवारी एका कार्यक्रमासाठी टोपे आले होते. त्या वेळी  ‘एमफुक्टो’ आणि ‘बुक्टू’ या प्राध्यापक संघटनांच्या सुमारे शंभर प्राध्यापकांनी घेराव घालून निषेधाच्या घोषणा देत टोपे यांना त्यांच्या मोटारीतून उतरण्यास भाग पाडले.
 राज्यातील सेट-नेटबाधित शिक्षकांना नियमित करण्यात यावे, या विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या आदेशाला १४ महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी त्याची सरकारने अंमलबजावणी केलेली नाही. जून, २०१२ ला आदेश काढून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते, मात्र हे आश्वासन सरकारने अद्याप पूर्ण केलेले नाही. घेराव घालणाऱ्या प्राध्यापकांनी प्रश्नांचा भडिमारच टोपे यांच्यावर केला. तेव्हा टोपे यांनी या संबंधात २७ नोव्हेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करू, असे आश्वासन दिले.