राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार ऐन दिवाळीत विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. एकीकडे फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना पवार या दौऱ्यात राजकीय आतीषबाजीच्या माध्यमातून मरगळलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करणार आहेत. 
गेल्या १३ वर्षांंपासून काँग्रेस व राष्ट्रवादी राज्यातील आघाडीची सत्ता सांभाळत असले तरी गेल्या काही दिवसात या दोन्ही पक्षातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या पाश्र्वभूमीवर पवार यांचा बहुप्रतिक्षित विदर्भ दौरा येत्या १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. १६ व १७ असे दोन दिवस पवार विदर्भात फिरणार असून, या काळात त्यांच्या पाच जिल्ह्य़ात जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. १६ नोव्हेंबरला सकाळी दिल्लीहून नागपूरला आल्यानंतर पवार थेट चंद्रपूरला रवाना होणार आहेत. येथील सभा आटोपल्यानंतर ते वध्रेला सायंकाळी एका सभेला संबोधित करणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी यवतमाळ, दुपारी बडनेरा व सायंकाळी अकोला येथील सभांना पवार मार्गदर्शन करणार आहेत. अकोल्याची सभा आटोपल्यानंतर विदर्भ एक्स्प्रेसने ते मुंबईला रवाना होणार आहेत.
पवार यांचा अधिकृत दौरा अद्याप आला नसला तरी या दौऱ्याविषयीच्या सूचना प्रदेश पातळीवरून या पाचही जिल्ह्य़ातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
येत्या ११ नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. हा सण सर्वत्र साजरा होत असताना पवार विदर्भात फिरणार आहेत. पवारांच्या प्रत्येक सभेला शेतकरी, शेतमजूर, महिला व कार्यकर्ता मेळावा, असे स्वरूप देण्यात आले आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने विदर्भात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची योजना राष्ट्रवादीच्या वर्तुळाने आखली आहे. ऐन दिवाळीत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व्यस्त असतात. त्यामुळे पवारांनी हाच दौरा या महिन्याच्या शेवटी करावा, अशी विनंती या पाच जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनी पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांकडे आज केली, मात्र सध्या तरी याच तारखा ठरलेल्या आहेत तेव्हा तयारीला लागा, असा निरोप या सर्वाना देण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर थोरल्या पवारांनी आता स्वत:च पक्ष पातळीवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. अजित पवारांच्या राजीनाम्याचे वादळ उठले असताना शरद पवार यांनी पक्षात अंतिम शब्द माझाच असेल, असे सूचक विधान केले होते. या पाश्र्वभूमीवर पवारांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विदर्भापासून सुरुवात केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीची विदर्भातील स्थिती अतिशय कमजोर आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षाला विदर्भात फारसे यश मिळू शकले नव्हते. चार आमदार व एक खासदार एवढेच संख्याबळ सध्या विदर्भात पक्षाजवळ आहे. अशा स्थितीत स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची वेळ आलीच तर विदर्भाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, याची जाणीव पक्षाच्या नेत्यांना आहे. म्हणूनच अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी विदर्भात भरपूर दौरे केले होते. पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युवती काँग्रेसचे मेळावे सर्वात आधी विदर्भात घेतले. आता या दोघांच्या प्रयत्नानंतर खुद्द पवार विदर्भात येत आहेत.
१९९८ ला काँग्रेस विभाजित झालेली नसताना पवारांच्या नेतृत्वाखाली विदर्भात ११ पैकी ११ खासदार निवडून आले होते. तेव्हा पवारांवर भरभरून प्रेम करणारी वैदर्भीय जनता राष्ट्रवादीचा उदय झाल्यानंतर मात्र नाराज झाली. ती सल मनात कायम असल्याने आता राष्ट्रवादीने पुन्हा एकदा विदर्भाकडे लक्ष देण्याची तयारी सुरू केली आहे. पवारांच्या या दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.