महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या कृती समितीचे कार्याध्यक्ष शरद राव यांना पदावरुन निलंबित करण्याचा ठराव आज समितीच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या नगरमध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आला. त्याचबरोबर कल्याणकारी मंडळासह रिक्षा चालकांच्या विविध मागण्या व प्रश्नांसाठी १८ जुलैला राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जागर धरणे’ आंदोलन करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
 रिक्षा पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव घुले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यानंतर समितीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी ही माहिती दिली. समितीचे कार्याध्यक्ष शरद राव यांनी यापूर्वीच पुण्यात स्वतंत्र मेळावा घेऊन, समितीचे अध्यक्ष बाबा आढाव व सरचिटणीस पवार यांचा पत्रव्यवहार सरकारने अधिकृत समजू नये अशी मागणी केली आहे. या पाश्र्वभूमीवर राव हे सवतासुभा निर्माण केल्याचा आरोप पवार यांनी केला व त्यांना कार्याध्यक्ष पदावरुन निलंबित करण्याचा ठराव केला. त्यामुळे संघटनेत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. तेही पवार यांनी मान्य करताना त्यास रावच जबाबदार असल्याचा आरोप केला. आजच्या बैठकीस डॉ. बाबा आढाव उपस्थित नव्हते, त्यामुळे या ठरावावर आढाव यांनीच पुढील निर्णय घ्यावा असे ठरले.
सरकारने रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करुन त्याची रुपरेषा जाहीर करु असे आश्वासन गेल्या अधिवेशनात दिले, मात्र त्याची अद्यापि पूर्तता करण्यात आली नाही. समितीशी चर्चा करुनच तातडीने मंडळ जाहीर करावे, क व ड वर्ग नगरपालिकांसह छोटय़ा महापालिका असलेल्या शहरात इलेक्ट्रॉनिक्स मीटरची सक्ती करु नये, रिक्षातून १० शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी मिळावी, भरमसाठ परवाना हस्तांतर शुल्क आकारुन सरकार रिक्षा चालकांच्या व्यवसायावर दरोडा घालत असल्याने हे शुल्क कमी ठेवावे, बेकायदा रिक्षा वाहतुकीवर कारवाई करावी या मागण्यांसाठी १८ जुलैला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरली जाणार आहेत.
त्यानंतरही निर्णय न झाल्यास सर्व परिवहन आयुक्त कार्यालयांसमोर निदर्शने केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले. सरकार उद्योगपतींसाठी नियमांत बदल करुन अनेक वाहनांना रिक्षा म्हणून परवानगी देत असल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला. यासाठी ‘क्वाड्री सायकल’ चे उदाहरण देण्यात आले. मच्छिंद्र ठोंबरे (धुळे), मल्हारी गायकवाड (कल्याण-डोंबिवली), अकुण घोरपडे (कोल्हापुर), अन्सार सय्यद (कराड), शेख शफिउद्दिन (औरंगाबाद), ताजोद्दिन मोमीन (नगर), चंद्रकांत कुलकर्णी आदींसह सुमारे शंभर प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.