पुरातन शस्त्रास्त्रे हा तसा प्रत्येकाच्या औत्सुक्याचा विषय. परंतु, या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीचे तंत्र आणि ती कोणासाठी व कोणत्या प्रयोजनासाठी निर्मिली गेली, याचेही काही संदर्भ आहेत. म्हणजे, राजाची शस्त्रास्त्रे वेगळी, राणीची वेगळी अन् राजकुमाराची लहान आकारातील शस्त्रास्त्रे वेगळी. एवढेच नव्हे तर, योद्यांकडून वापरण्यात येणारी शस्त्रास्त्रे तुलनेत मजबूत स्वरूपाची पूर्णत: वेगळी असत. नजराणा म्हणून सन्मानपूर्वक दिली जाणारी नक्षीदार शस्त्रास्त्रे वेगळ्या धाटणीची असत. शिवकाळात शस्त्र निर्मितीचे तंत्र इतके प्रगत होते की, आतासारखे कधी शस्त्र निकामी झाले म्हणून युद्धात अपयश स्वीकारावे लागले नाही. ही सर्व वैविध्यपूर्ण शस्त्रास्त्रे पाहतानाच त्यांच्या अनोख्या इतिहासाचा पट स्वा. सावरकर साहित्य संमेलनादरम्यान आयोजित शिवकालीन दुर्मीळ शस्त्रास्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे.
येथील ऊर्जा युवा प्रतिष्ठान आणि सावरकर साहित्य अभ्यास मंडळ यांच्यातर्फे १५ ते १७ मार्च या कालावधीत रौप्य महोत्सवी स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन गंगापूर रस्त्यावरील चोपडा लॉन्समध्ये करण्यात आले आहे. या निमित्ताने, सावरकरी विचारांचा महोत्सव घडविण्याबरोबर संमेलनात विविध प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील गिरीश जाधव यांचे शिवकालीन दुर्मीळ शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन हे त्यापैकीच एक. संमेलनस्थळी अर्थात ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहित्य नगरी’मध्ये हे प्रदर्शन सलग तीन दिवस खुले राहणार आहे. प्रदर्शनात सुमारे ३०० प्रकारची  शस्त्रास्त्रे पाहावयास मिळतील. सुमारे ३२ वर्ष देशभरात भ्रमंती करून जाधव यांनी जवळपास एक हजारहून अधिक दुर्मीळ शस्त्रास्त्रांचा संग्रह केला आहे. हा सर्व खजिना नाशिकला आणणे अशक्य असल्याने त्यातील निवडक, पण वैविध्यपूर्ण शस्त्रास्त्रे प्रदर्शनात मांडण्यात येतील. ‘बी. एस्सी’ आणि ‘एमबीए’ असे शिक्षण घेतलेल्या जाधव यांनी पुरातन शस्त्रास्त्रांविषयी सखोल अभ्यास केला आहे. महाराष्ट्र इतिहास परिषदेचे मार्गदर्शक म्हणूनही ते काम करतात. शस्त्रांस्त्रांविषयीच्या अभ्यासामुळे प्रदर्शनात शस्त्रास्त्रे बघण्याबरोबर त्यांची रोचक माहिती जाणून घेण्याचा आनंद विद्यार्थ्यांसह नागरिकांना मिळू शकेल.
प्रदर्शनात गदा, धनुष्य-बाण, तलवारी, परीघ, मुसळ, गुप्ती, भाला, कटय़ार, जांबिया, खंजीर, बिचवा, पेशकबज या शस्त्रास्त्रांचे विविध प्रकार तसेच चिलखत, अंगरखा हे सर्व एकाच ठिकाणी पहाता येतील. पुरातन काळात जगात पाच शस्त्र परंपरा होत्या. त्यातील एक असलेल्या भारतीय शस्त्र परंपरेत उत्तर भारतीय अन् दाक्षिणात्य असे दोन गट होते. त्यातही राजपूत, मराठा, मोगल यांच्या शस्त्रास्त्रांची रचना पूर्णत: वेगळी असल्याचे निरीक्षण आपण नोंदविले असल्याचे जाधव यांनी ‘नाशिक वृत्तान्त’ला सांगितले. प्रदर्शनात तलवारीचे विविध प्रकार अन् त्यांचे वैशिष्ठय़े जाणून घेता येईल. तीन फुटी वक्राकार ‘समशेर’, चार फुटी लांब सरळ असणारी तलवार म्हणजे ‘धोप’. महाराष्ट्रीय पद्धतीची वरच्या बाजूस किंचितशी मोठी होत जाणारी दुधारी तलवार म्हणजे ‘खांडा’. हत्तीचा पाय तोडण्यासाठी वापरली जाणारी ‘कुऱ्हाड’, कटय़ारींचे असेच प्रकार, लहान छुपी शस्त्रे बघायला मिळतील. या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीत अत्युच्च दर्जाच्या लोखंडाचा वापर केला जात असे. शस्त्रास्त्र निर्मितीचे तंत्र इतके प्रगत होते की, युद्धात कधी शस्त्रास्त्रांनी धोका दिला नाही. म्हणजे शस्त्र निकामी झाल्यामुळे कधी युद्धात अपयशास सामोरे जावे लागले नाही, असा दाखलाही जाधव यांनी दिला. नाशिककरांनी या अनोख्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक अजय बोरस्ते यांनी केले आहे.
गुर्जेबदार
या प्रदर्शनात एक अनोखे शस्त्र पहावयास मिळणार आहे, ते म्हणजे गुर्ज. प्रभावी व वजनदार असणाऱ्या या शस्त्राचा युद्धात फारसा वापर केला जात नसे. कारण, ते चालविणे म्हणजे अवघड काम. अतिशय वजनदार असणारे हे शस्त्र वरील बाजूस गदेसारखे दिसते. परंतु, गदेचा वरील भाग भरीव असला तरी गुर्जचा हा भाग लोखंडी दातऱ्यांचा असतो. मूठ मात्र तलवारीसारखी. जो योद्धा तलवारबाजीत तरबेज व्हायचा, त्याला पुढे पट्टा चालविण्याची संधी मिळायची. पट्टे चालविण्यातही तो निष्णांत झाला की पुढे काय, याचे उत्तर गुर्जचे अवघड प्रशिक्षण घेण्यात दडलेले असायचे. अतिशय मोजके योद्धेच गुर्ज चालविण्यात वाकब्गार होऊ शकत. जे योद्धे त्यात वाकब्गार होत, त्यांना ‘गुर्जेबदार’ असे अभिमानाने म्हटले जाई. म्हणजे भालदार, चोपदार त्याप्रमाणे ‘गुर्जेबदार’ ही अतिशय प्रतिष्ठेची व मानाची पदवी मानली जाई. शहाजीराजांचा अंगरक्षक ‘गुर्जेबदार’ असल्याची इतिहासात नोंद असल्याचे सांगितले जाते.

Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?