सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला रविवारी सकाळी नंदीध्वजांच्या भव्य मिरवणुकीने प्रारंभ झाला. साडेआठशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेच्या पहिल्या दिवशी, शहराच्या पंचक्रोशीत सिद्धेश्वर महाराजांनी प्रतिष्ठापना केलेल्या ६८ लिंगांना नंदीध्वजांच्या मिरवणुकीद्वारे तैलाभिषेक (यण्णीमज्जन) करण्यात आला. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रातून लाखो भाविक सोलापुरात दाखल होत आहेत.
उत्तर कसब्यातील मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाडय़ातून सकाळी ८.३० वाजता केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते उंच नंदीध्वजांची पूजा करण्यात आल्यानंतर उत्साही आणि भक्तिमय वातावरणात नंदीध्वजांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. या वेळी उज्ज्वला शिंदे यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे, महापौर अलका राठोड, सिद्धेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष धर्मराज काडादी, आमदार विजय देशमुख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, शनिवारी मध्यरात्रीनंतर मानाच्या पहिल्या दोन नंदीध्वजांना ‘साज’ चढविण्यात आला होता. उर्वरित विविध समाजाचे मान असलेले पाच नंदीध्वज सकाळी हिरेहब्बू वाडय़ात आणले गेले. विविध पारंपरिक मार्गावरून ही मिरवणूक हळूहळू चालत दुपारी सिद्धेश्वर मंदिरात पोहोचली. या मिरवणुकीत पूर्वापार परंपरेनुसार हिरेहब्बूंनी हातात श्री सिद्धेश्वरांचा योगदंड धरला होता. तत्पूर्वी, सिद्धेश्वर प्रशालेसमोर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या प्रवेशद्वाराजवळ सातही नंदीध्वज आल्यानंतर हिरेहब्बू यांना सरकारतर्फे देशमुख यांनी आहेर केला. हा मान शेकडो वर्षांपासून चालत आला आहे. सिद्धेश्वर मंदिरात नंदीध्वज पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पूजाविधी झाला. या वेळी हिरेहब्बू मंडळींनी मानकरी सुहास ऊर्फ तम्मा शेटे यांना मानाचा विडा दिला. नंतर इतर मानकऱ्यांना विडे देण्यात आले.
सिद्धेश्वर मंदिरात ‘श्रीं’च्या मूर्तीला तैलाभिषेक झाल्यानंतर शहराच्या पंचक्रोशीतील ६८ लिंगांना तैलाभिषेक घालण्यासाठी ही मिरवणूक मार्गस्थ झाली. सात नंदीध्वजांमध्ये पहिला नंदीध्वज सिद्धेश्वर देवस्थानाचा, दुसरा देशमुख घराण्याचा, तिसरा लिंगायत माळी समाजाचा, चौथा व पाचवा विश्व ब्राह्मण समाजाचा, तर सहावा व सातवा नंदीध्वज मातंग समाजाचा असतो. यात श्री सिद्धेश्वर महाराजांच्या शिकवणुकीनुसार सामाजिक समतेचे दर्शन घडते. हलग्यांचा कडकडाट, संगीत बँड पथकांचा सुमधूर निनाद, सनई-चौघडय़ांचा मंगलमय स्वर, भाविकांमधून उत्स्फूर्तपणे होणारा श्री सिद्धेश्वराचा जयजयकार अशा उत्साही वातावरणात निघालेल्या नंदीध्वजांचे मानकरी व शेकडो भाविकांनी पूर्वापार परंपरेनुसार परिधान केलेला पांढऱ्याशुभ्र ‘बारा बंदी’चा पोषाख मिरवणुकीच्या मांगल्याची साक्ष देत होता. रात्री उशिरा ही मिरवणूक उत्तर कसब्यात हिरेहब्बू वाडय़ात परत येऊन विसर्जित झाली.
यात्रेनिमित्त सिद्धेश्वर मंदिर परिसरात तसेच पंचकट्टा व होम मैदानावर विविध करमणुकीची, खेळण्यांची, खाद्यपदार्थाची दालने उभारण्यात आली आहेत. भोईराज आर्ट अँड क्राफ्ट प्रस्तुत ‘आनंदनगरी’ ही या यात्रेची वैशिष्टय़े आहेत. भाविकांच्या व आबालवृद्ध नागरिकांच्या गर्दीने यात्रा फुलून गेली आहे. यात्रेनिमित्त सिद्धेश्वर मंदिरास नेत्रदीपक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर व तलाव परिसर सजला आहे.
तीस क्विंटल भाकरी
सिद्धेश्वर देवस्थान अन्नछत्रातर्फे यात्रेनिमित्त दररोज पाच ते सहा हजार भाविकांना महाप्रसाद देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी गेल्या १ जानेवारीपासूनच भाकरी बनविण्याचे काम महिलांमार्फत करण्यात येत आहे. तीस क्विंटल ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी तयार करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे नंदीध्वज मानकऱ्यांसाठी लाडू आणि चिवडा देण्याचीही व्यवस्था समितीतर्फे करण्यात आली आहे.
आज अक्षता सोहळा
उद्या सोमवारी सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता सिद्धेश्वर मंदिरालगत संमती कट्टय़ावर अक्षता सोहळा संपन्न होणार आहे. सिद्धेश्वर महाराजांशी एका कुंभारकन्येने विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु सिद्धेश्वर महाराजांनी त्यास नकार देत आपल्या योगदंडाशी विवाह करण्यास संमती दिली होती. या घटनेच्या स्मृती म्हणून प्रतीकात्मक विवाह सोहळय़ातील अक्षता टाकल्या जातात. या वेळी लाखो भाविकांची उपस्थिती असते. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आपल्या कुटुंबीयांसह परंपरेनुसार या अक्षता सोहळय़ात सहभागी होणार आहेत.
पोलीस यंत्रणेवर ताण
यंदा सिद्धेश्वर यात्रेच्या तोंडावर शहरात दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरून पाच तरुणांना मध्य प्रदेशच्या एटीएस पथकाने अटक केली होती. तसेच तीन बॉम्ब व अन्य स्फोटकेही जप्त केली होती. या पाश्र्वभूमीवर सिद्धेश्वर यात्रेच्या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनावर मोठा ताण पडत आहे. यात्रेच्या काळातच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे चार दिवस सोलापुरात असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठीचा ताण आणखी वाढल्याचे दिसून येते.