गाळप फक्त ४ लाख मे.टनाचे, उतारा केवळ ८.८५ टक्के
राज्यात ऊस गाळप हंगाम मध्यावर आलेला असताना विदर्भातील साखर कारखान्यांमधून आतापर्यंत केवळ ४.०७ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे. साखरेचा उतारा देखील दशकभरातील सर्वात कमी म्हणजे ८.८५ टक्के नोंदवला गेला आहे. विदर्भातील साखर उद्योगाची ही आजवरची अत्यंत निराशाजनक कामगिरी ठरली आहे.
विदर्भात १६ सहकारी आणि ७ खाजगी साखर कारखान्यांपैकी बहुतांश साखर कारखाने मोडीत निघाले आहेत. यंदाच्या गळीत हंगामात विदर्भात केवळ एका सहकारी आणि ५ खाजगी, अशा सहा कारखान्यांमध्ये ऊसाचे गाळप सुरू झाले. या कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता १० हजार ५०० मेट्रिक टन आहे. साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या हंगामात ८ जानेवारीअखेर अमरावती विभागातील एक सहकारी आणि २ खाजगी साखर कारखान्यांमध्ये १.७० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे आणि १.५९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखरेचा उतारा फक्त ९.३५ टक्के आहे. नागपूर विभागातील तीन खाजगी साखर कारखान्यांमध्ये २.३७ लाख मे.टन गाळप आणि १.९८ लाख क्विंटल उत्पादन मिळाले आहे. या विभागात साखरेचा उतारा राज्यात सर्वात कमी म्हणजे ८.८५ टक्के आहे. साखरेचा कमी उतारा, हे साखर उद्योगासाठी धोकादायक संकेत मानले जातात. आजवर साखरेच्या उताऱ्याच्या बाबतीत विदर्भ हा राज्यात तळाशीच होता, पण यंदा दशकातील नीचांक नोंदवला गेला आहे.
राज्याचा साखरेचा उतारा सरासरी १०.५४ टक्के आहे. त्या तुलनेत विदर्भातील साखर कारखान्यांची स्थिती बिकट आहे. काही वर्षांपूर्वी विदर्भातील साखरेचा उतारा १०.७९ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची उदाहरणे आहेत, पण तीन वर्षांपासून हा आलेख घसरत आला आहे. संपूर्ण राज्यात आतापर्यंत ३२२.१७ लाख मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे आणि ३३९.६८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यात एकटय़ा पुणे विभागाचा वाटा १३५.६० लाख क्विंटलचा आहे.
गेल्या हंगामात ८ जानेवारीअखेर राज्यात ३१० लाख मे.टन गाळप आणि ३३१ लाख क्विंटल उत्पादन झाले होते. विदर्भात काही वर्षांपूर्वी सोळा सहकारी साखर कारखाने होते. त्यापैकी आता केवळ एक सहकारी साखर कारखाना गाळप क्षमतेत उरला आहे. अनेक साखर कारखान्यांची यंत्रसामुग्री धूळखात पडून आहे. साखरेचा उतारा चांगला निघावा, यासाठी ऊस लागवडीपासून ते तोडणीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन अपेक्षित असते. त्याची विदर्भात वानवा आहे. २००७-०८ च्या गाळप हंगामात विदर्भातील १० साखर कारखान्यांमध्ये १८.४२ लाख मे.टन ऊसाचे गाळप झाले होते आणि १९.६९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते.
यंदा केवळ सहाच कारखाने सुरू होऊ शकले. त्यात खाजगी साखर कारखान्यांची संख्या पाच आहे. सहकारी साखर कारखानदारी अस्तंगत होताना दिसत आहे. ऊसाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. साखर कारखान्यांना भेडसावणारी ही सर्वात मोठी समस्या आहे. दूरवरून ऊस आणून साखर कारखाने सुरू ठेवणारे परवडणारे नाही, शिवाय विदर्भात ऊस तोडणीसाठी प्रशिक्षित कामगार नाहीत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूकदार आणि कंत्राटदारांवर विसंबून रहावे लागते. त्यातच या कारखान्यांकडे पुरेसे जोडधंदे नाहीत. ‘अल्कोहोल’ किंवा ‘कार्डबोर्ड’च्या उत्पादनासाठी कारखान्यांना जोडून यंत्रसामुग्री बसवावी लागते.   उद्यमशीलतेअभावी याकडे  दुर्लक्ष झाल्याने त्याचा जबर फटका सहकारी साखर कारखान्यांना बसला आहे आणि त्याची किंमत मात्र शेतकऱ्यांना मोजावी लागली आहे.