बेकायदा बांधकामांच्या विरोधात तसेच रस्तारुंदीसाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत शनिवारी सिंहगड रस्त्यावर धडक कारवाई करण्यात आली. धायरी फाटा ते अभिरुची पोलीस चौकीदरम्यानच्या चार व पाच मजली मिळून सहा इमारती या कारवाईत पाडण्यात आल्या. दिवसभरात पन्नास हजार चौरसफूट बांधकाम पाडण्यात आले.
धायरी फाटा ते अभिरुची पोलीस चौकीदरम्यानच्या सिंहगड रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार असून या रुंदीकरणात सहा बेकायदा इमारतींचा अडथळा येत होता. त्यामुळे महापालिकेतर्फे नोटिसा देण्यात आल्या होत्या.
कारवाईत चार मजली तीन आणि पाच मजली तीन अशा सहा इमारती पाडण्यात आल्या. महापालिकेचे दहा अधिकारी, तसेच तीस बिगारी सेवक, तीस पोलीस यांचा ताफा यावेळी होता. चार जेसीबी, एक पोकलेन, दोन एक्सकटर्स आणि सहा डंपर कारवाईसाठी वापरण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, तसेच माधव जगताप, रमेश शेलार, युवराज देशमुख, अमर शिंदे, ललित बेंद्रे, सुरेश देसाई या महापालिका अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पाडण्यात आली. सकाळी आठ वाजता सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी सातपर्यंत सुरू होती. त्यामुळे सकाळपासूनच सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी सुरू झाली. काही काळ हा रस्ताही बंद ठेवण्यात आला होता.