सोलापूर-पुणे महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम निकृष्ट पद्धतीने होत असल्याची तक्रार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.
भुजबळ यांनी पाठविलेल्या पत्रात डोंगरे यांनी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल विविध आक्षेप घेतले आहेत. टेंभुर्णी-सोलापूर दरम्यान चौपदरीकरणाच्या कामात रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरणासह उड्डाणपूल, भुयारी मार्ग, रस्ते दुभाजक  आदी कामे दर्जेदार होण्यासाठी प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही. रस्ते कामांवर पाणी मारण्याची क्षुल्लक बाबही पूर्ण केली जात नाही. रस्त्यांच्या बाजूने वाहने व बैलगाडय़ांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्थित सोय करण्यात आली नाही. ही कामे करणारे कंत्राटदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची यंत्रणा यांच्यात साटेलोटे आहे. त्यामुळे रस्त्यांच्या विकासाची कामे दर्जेदार न होता निकृष्ट पद्धतीची होत आहेत. यामुळे शासनाला व करदात्यांना आगामी काळात लवकरच मोठा आर्थिक भरुदड सहन करावा लागणार आहे. पर्यायाने शासन व जनतेची फसवणूक होत असल्याचे डोंगरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.