महाराष्ट्रात वैदिक सूर्यसिद्धान्तावर आधारित पंचांगांची असलेली उणीव संगणक अभियंता गौरव देशपांडे यांनी भरून काढली आहे. तिथी, नक्षत्रे आदींच्या अचूक वेळा, विवाह, वास्तूशांत यांचे अचूक मुहूर्त आणि धर्मशास्त्रीय उपयुक्त माहिती पंचांगात असल्याचा दावा देशपांडे यांनी केला आहे.
आधुनिक दृश्य गणित पंचांग (अमेरिकन नॉटिकल गणितावर आधारित) आणि प्राचिन वैदिक पंचांग गणितावर आधारित अशा दोन पद्धतीने पंचांगे तयार केली जातात. उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांमध्ये सूर्यसिद्धान्तावर आधारित पंचांगांचाच वापर केला जातो. महाराष्ट्रात मात्र आत्तापर्यंत वैदिक सूर्यसिद्धान्तावर आधारित एकही पंचांग नव्हते, ते आपण तयार केले असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.  मी व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलो तरी मला लहानपणापासूनच वैदिक ग्रंथ आणि खगोलशास्त्र याविषयी रुची होती. यातूनच पुढे ज्योतिषशास्त्र आणि पंचांग गणित याचा अभ्यास केला. काशी, धारवाड, शृंगेरी आदी ठिकाणी वेळोवेळी भेटी दिल्या. तेथे या विषयातील तज्ज्ञ आणि अधिकारी व्यक्तींबरोबर चर्चा झाली. ही सर्व मंडळी सूर्यसिद्धान्तावर आधारित पंचांगांचा वापर करत असल्याचे दिसून आले. या तज्ज्ञ मंडळींशी झालेल्या चर्चेतून आणि मिळालेल्या मार्गदर्शनातून आपण वैदिक सूर्यसिद्धान्तावर आधारित हे पंचांग तयार केले असल्याचे देशपांडे म्हणाले.   महाराष्ट्रात सूर्यसिद्धान्तावर आधारित पंचांगे तयार केली जावीत, यासाठी विविध पंचांगकर्त्यांशी आपण चर्चा केली पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंतही देशपांडे यांनी व्यक्त केली.  गौरव देशपांडे संपर्क- ९८२३९१६२९७/ ई-मेल  gaurav1601@gmail.com