सलमानखानच्या ‘दबंग-२’मध्ये करिना कपूरचे एक आयटम साँग आहे, ‘पटा ले, मुझे मिसकॉल से.’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले. मिसकॉल देऊन मुलगी पटवता येते, असे या गाण्यातून सूचित करण्यात आले होते. याच गाण्यामुळे प्रभावित होऊन एका तरुणाने मुलगी पटविण्याचा प्रयत्न केला. त्यात तो यशस्वीही झाला. पण नंतर पोलिसांच्या जाळ्यात सापडला..
नालासोपाऱ्याला राहणारा विजय सरकार (२८) हा तरुण नालासोपाऱ्यात बिगारी कामे करतो. मोबाईलवरून अनोळखी नंबरवर ‘मिस्डकॉल’ द्यायचा आणि एखाद्या मुलीने फोन केला तर तिच्याशी बोलून जाळे टाकायचा. अशाच एका प्रयत्नात त्याला एका मुलीने कॉल बॅक केला. ही मुलगी होती उत्तर प्रदेशातल्या देवरिया जिल्ह्यात राहणारी १४ वर्षांची सपना पांडे (नाव बदलेले). चुकून कॉल लागला होता, असे विजयने सुरुवातीला तिला सांगितले. नंतर तुझा आवाज गोड आहे, असे सांगत तिच्याशी सलगी वाढवली. त्यानंतर हळूहळू मैत्री केली. विजय बिगारी आहे. पण ‘मुंबईत आपण ठेकेदार आहोत’, अशी थाप त्याने मारली होती. सपना अल्पवयीन होती. त्यामुळे ती पटकन विजयच्या जाळ्यात सापडली. ते दररोज फोनवर बोलू लागले. हळूहळू विजयने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मुलीवर प्रभाव टाकण्यासाठी त्याने तिला उत्तरप्रदेशातील मित्राच्या माध्यमातून काही भेटवस्तूही पाठविल्या होत्या. आपल्याला मुंबईचा देखणा आणि श्रीमंत जोडीदार मिळाला या आनंदात सपना होती. आपण लग्न करून मुंबईला जाऊ, असे विजयने तिला सांगितले. १५ जुलैला विजय आणि त्याचा मित्र दीपक वर्मा देवरिया गावात गेले. तेथून त्यांनी सपनाला नालासोपाऱ्यात आणले.
स्वप्नांच्या महालात वावरणाऱ्या सपनाला नंतर खरी हकीगत कळली. विजय नालासोपाऱ्याच्या एका झोपडीत रहात होता. पण आता खूप उशीर झाला होता. सपनाच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार तिथे दिली होती. गुन्हे शाखा ११ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून नालासोपाऱ्यातून विजय आणि दीपक वर्मा यांना अटक केली आणि सपनाची सुटका केली. या दोघांवर अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 मिस्डकॉलला उत्तर दिल्याने कोवळ्या वयातच सपनाचे आयुष्य उद्धवस्त झाले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजीव भोळे, प्रवीण कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, परशुराम साटम, मनोहर हारपुडे, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे आदींच्या पथकाने केला.