रहिवाशांना होणारा त्रास रोखणार
पूर्व मुक्त मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे आसपासच्या निवासी इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होऊ नये यासाठी तेथील आवाजाचे प्रमाण अभ्यासण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. हा अभ्यास झाल्यानंतर ध्वनीची मर्यादा प्रमाणापेक्षा जास्त असलेल्या ठिकाणी ध्वनिरोधक यंत्रणा बसवण्याचा ‘एमएमआरडीए’चा विचार            आहे.
पूर्व मुक्त मार्गाचे उद्घाटन १३ जून रोजी झाले. त्यामुळे मुंबईहून नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या वाहनांचा वेळ आणि इंधन दोन्हींची बचत होत आहे. पूर्व मुक्त मार्ग सुरू होताच वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाल्याने काही दिवसांतच त्यावरून अपेक्षेनुसार दिवसाला सुमारे २४ ते २५ हजार वाहने प्रवास करत आहेत. हा मार्ग शिवडी, चेंबूर, वडाळा आदी ठिकाणी निवासी भागातून जातो. रस्त्याच्या आसपास इमारती, घरे आहेत. वाहनांच्या वर्दळीमुळे ध्वनिप्रदूषण होऊन त्यांना त्रास होण्याचा संभव आहे.
या मार्गावरील आवाजाच्या प्रमाणाचे मोजमाप करण्याचे प्राधिकरणाने ठरवले आहे. आवाजाचा अभ्यास झाला की नेमक्या कोणत्या ठिकाणी ध्वनिप्रदूषण आहे, किती प्रमाणात आहे, तेथे ध्वनीचे प्रमाण कमी करण्यासाठी कशापद्धतीने ध्वनीरोधक यंत्रणा बसवावी लागेल हे सारे स्पष्ट होईल. त्यानंतर अभ्यासातील निष्कर्ष व शिफारशींनुसार पूर्व मुक्त मार्गावर ध्वनीरोधक यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.