पश्चिम विदर्भात दमदार पावसामुळे पेरण्यांना वेग आला असून आतापर्यंत पन्नास टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत. झालेल्या पेऱ्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. शेतकऱ्यांनी कपाशीऐवजी यंदाही सोयाबीनलाच अधिक पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
या जिल्ह्य़ातील सरासरी लागवडीखालील ७ लाख १४ हजार हेक्टरच्या तुलनेत ३ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्रात (४६ टक्के) पेरण्या आटोपल्या आहेत. सर्वाधिक १ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनने व्यापले आहे. त्या खालोखाल ८२ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रात कपाशीचा पेरा झाला आहे. अलीकडच्या काळात तुरीला चांगले दर मिळू लागल्याने तूर लागवडीकडे कल वाढला आहे. जिल्ह्य़ात ४३ हजार ९१८ हेक्टर क्षेत्रात तुरीचा पेरा झाला आहे. जिल्ह्य़ातील खारपाणपट्टय़ात मुगाचे क्षेत्र अधिक आहे. यंदा आतापर्यंत १५ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रात मुगाचा पेरा झाला असून मुगाच्या लागवडीचा काळ कमी असल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. धारणी आणि चिखलदरा तालुक्यात भाताची लागवड केली जाते. या दोन तालुक्यांमध्ये ६४३ हेक्टरमध्ये भातरोवणी आटोपली आहे.
बुलढाणा जिल्ह्य़ात ७ लाख ४७ हजार हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ३ लाख ३९ हजार हेक्टरमध्ये (४५ टक्के) पेरणी आटोपली आहे. बुलढाण्यातही शेतकऱ्यांनी सोयाबीनलाच अधिक पसंती दिली आहे. आतापर्यंत १ लाख ८५ हजार हेक्टमध्ये सोयाबीन पेरले गेले आहे. हे क्षेत्र आताच ८९ टक्के क्षेत्रात पोहोचले आहे, तर ८० हजार ५३२ हेक्टरमध्ये कपाशीचा पेरा झाला आहे. २४ हजार हेक्टरमध्ये तूर आहे.
अकोला जिल्ह्य़ात ४ लाख ८३ हजार हेक्टरपैकी ३ लाख ३९ हजार हेक्टरमध्ये (५५ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीनचा पेरा १ लाख ३० हजार हेक्टर, कपाशी ६६ हजार ३१२, तूर २७ हजार ८८१ हेक्टर, असे चित्र आहे. वाशीम जिल्ह्य़ातील सरासरी ४ लाख २६ हजार हेक्टरच्या तुलनेत २ लाख ६४ हजार हेक्टरमध्ये (४४ टक्के) पेरा झाला आहे. सोयाबीन १ लाख २७ हजार हेक्टर, कपाशी १८ हजार ४२७, तूर २३ हजार ८०३ हेक्टरमध्ये पेरा आहे.
यवतमाळ जिल्हा कपाशीच्या लागवडीबाबतीत आघाडीचा जिल्हा मानला जातो. या भागातील शेतकऱ्यांनी यंदाही आतापर्यंत कपाशीलाच अधिक पसंती दिली आहे. जिल्ह्य़ात २ लाख २७ हजार हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र झाले आहे. त्या खालोखाल ८६ हजार ५८६ हेक्टरमध्ये सोयाबीन आणि ३३ हजार हेक्टरमध्ये तुरीची लागवड झाली आहे. जिल्ह्य़ातील सरासरी ९ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३ लाख ५८ हजार हेक्टरमध्ये (४० टक्के) पेरण्या आटोपल्या आहेत. अमरावती विभागात सोयाबीनचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आला होता. अकोला जिल्ह्य़ात तर पन्नास टक्के पेरण्यांमध्ये सरासरीएवढा सोयाबीनचा पेरा झाला आहे. हे क्षेत्र दुपटीने वाढेल, असा अंदाज आहे. यवतमाळ वगळता सर्व जिल्ह्य़ांमध्ये शेतकऱ्यांनी पहिली पसंती सोयाबीनलाच दिली आहे. सध्या संपूर्ण विभागात पिकांसाठी पोषक वातावरण झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. आठवडाभरात ९० टक्क्यांपर्यंत पेरा होऊ शकेल, असा कयास आहे.