मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत छुपेपणे सट्टा सुरू असतो, हे गुपित राहिलेले नाही. किंबहुना या छुप्यापद्धतीने सुरू असलेल्या सट्टय़ाबाबत फक्त पोलिसांनाच नव्हे तर संघटित गुन्हेगारी टोळ्यांनाही हप्ते द्यावे लागतात. अशाच एका प्रकरणात दाऊद टोळीच्या गुंडांनी लाखो रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. अटकेत असताना एका सट्टेबाजानेच चौकशीत ही माहिती पोलिसांना दिली आहे.
सट्टा पूर्णपणे बंद असल्याचा दावा पोलिसांकडून केला जातो. मात्र आता सट्टा खेळण्याची पद्धत बदलली गेल्याने मोबाईलवरूनही गुपचूप सट्टा लावला जात असल्यामुळे त्याची माहिती मिळणे पोलिसांना कठिण झाले आहे. मुंबईतील अनेक पंटर्स आजही सट्टेबाजांच्या संपर्कात आहेत. आयपीएलमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंगवरून आजही सट्टा व्यवस्थित सुरू असल्याचे स्पष्ट झाले होते. सध्या सुरू असलेल्या क्रिकेटच्या सामन्यांवरही सट्टा खेळला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या सट्टय़ापोटी गुंड टोळ्यांनाही सट्टेबाजांना हप्ता द्यावा लागतो. अलीकडेच एका उपनगरात आपल्या हप्त्याची रक्कम दाऊद टोळीचे दोन गुंड एका पंचतारांकित हॉटेलात येऊन घेऊन गेले. ही माहिती चौकशीतच बाहेर आल्याचे सूत्रांनी सांगितले.