30 March 2020

News Flash

मूकबधिर मुलांसाठी ‘स्पीच थेरपी’

मूकबधिर मुलांवर वेळेत ‘स्पीच थेरपी’चे उपचार केले तर ते व्यवस्थित शिक्षण घेऊन समाजापुढे जाऊ शकतात. याच उद्देशाने एका अंगणवाडी सेविकेने स्वत:हून ही उपचारपद्धती, विशेष बालके

| February 19, 2014 03:14 am

मूकबधिर मुलांवर वेळेत ‘स्पीच थेरपी’चे उपचार केले तर ते व्यवस्थित शिक्षण घेऊन समाजापुढे जाऊ शकतात. याच उद्देशाने एका अंगणवाडी सेविकेने स्वत:हून ही उपचारपद्धती, विशेष बालके व त्यांच्या मातांना शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तिला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे प्रोत्साहन मिळाले आहे.
पुष्पा गांगर्डे असे या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. त्या कोंभळी (ता. कर्जत) येथे गेल्या तीन वर्षांपासून अंगणवाडी सेविका आहेत. त्या नगरमध्ये प्रशिक्षण वर्ग सुरू करणार आहेत. स्पीच थेरपीसाठी बाजारात खासगी क्लासेस उपलब्ध आहेत, मात्र त्याचे शुल्क प्रचंड आहे, शिवाय त्याची अनेकांना माहिती नाही. मूक, कर्णबधिर मुलांना योग्य अशा लहान वयातच तसेच त्यांच्या मातांना प्रशिक्षण मिळाले तरच त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. दर शनिवारी सकाळी १० ते ४ दरम्यान याचे प्रशिक्षण वर्ग नगर शहरात सुरू केले जाणार आहेत. शहराच्या लालटाकी भागात असलेल्या जि. प. कर्मचारी निवासस्थानाच्या आवारातील ‘कम्युनिटी हॉल’ त्यासाठी विभागाने उपलब्ध करून दिला आहे.
गांगर्डे यांचा स्वत:चा मुलगा कर्णबधिर आहे, त्याच्यासाठी त्यांनी कोंभळी येथून दर आठवडय़ाला पुणे येथे जाऊन, मोठे शुल्क देऊन स्पीच थेरपीचा कोर्स केला. त्यामुळेच त्यांचा मुलगा व्यवस्थित बोलू शकला व सध्या नगरमध्ये एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पाचवीचे शिक्षणही घेत आहे. माता व मुलांनी ही स्पीच थेरपी लवकर कशी अवगत करावी, यासाठी गांगर्डे यांनी त्यात स्वत:च्या अनुभवाची भरही घातली. त्याद्वारे त्यांनी कोंभळी व कर्जत परिसरातील काही मुलांना मोफत प्रशिक्षणही दिले. त्याचा चांगला फायदा झाला. परंतु प्रत्येकाला शहरात जाऊन, मोठे शुल्क देऊन असे प्रशिक्षण घेणे शक्य होणार नाही, हे लक्षात घेऊन गांगर्डे यांनी आपल्या अनुभवाचा फायदा विशेष गरज असणारी मुले व त्यांच्या मातांना देण्याचा निर्णय घेतला.
हा विचार त्यांनी जि. प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा काकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे यांच्याकडे मांडला. त्यांनी लगेच गांगर्डे यांना त्यासाठी प्रोत्साहन दिले. गांगर्डे यांच्या या निर्णयाबद्दल त्यांचा आज झालेल्या समितीच्या सभेत सभापती काकडे व सदस्या योगिता राजळे यांनी सत्कारही केला व लालटाकी भागातील जि. प. निवासस्थानाच्या आवारातील कम्युनिटी हॉल या प्रशिक्षणासाठी उपलब्धही करून दिला. समितीनेच गांगर्डे यांना त्या कोंभळी येथून येऊन-जाऊन करणार असल्याने प्रशिक्षणासाठी दरमहा केवळ १०० रुपये इतके अल्प शुल्क आकारण्याची सूचना केली. या प्रशिक्षणासाठी २० जणींनी अर्ज सादर केल्याची माहिती काकडे यांनी दिली.
 सेविकेस प्रशिक्षण देणार
ग्रामीण भागातील अंगणवाडय़ांतूनही ऐकू, बोलू न शकणारी बालके आहेत. अंगणवाडय़ातून सहा वर्षांची बालके असतात, त्यांना अंगणवाडी सेविकांचाच सहवास अधिक असतो. अशा सेविकांनी पुढाकार घेतल्यास, प्रत्येक तालुक्यातील एका सेविकेस स्पीच थेरपीचे प्रशिक्षण दिले जाईल. अशा प्रशिक्षित सेविकेने इतर सेविकांना प्रशिक्षण दिल्यास त्याचा मोठा फायदा विशेष गरजा असणाऱ्या बालकांना होईल, यासाठी समिती प्रयत्नशील असल्याचे सभापती काकडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2014 3:14 am

Web Title: speech therapy for deaf dumb children
टॅग Children
Next Stories
1 समूह स्वच्छतेवर महापौर ठाम
2 कुख्यात गुंड शाहरूखकडून पिस्तूल हस्तगत
3 साहित्यकृतीशी प्रामाणिक राहिले पाहिजे- विश्वास पाटील
Just Now!
X