मुलींची पावले भविष्यातील आदर्शाच्या पाऊलखुणाच असल्याने समाजात वावरताना त्यांनी प्रत्येक पाऊल जपून टाकावे. बॉयफ्रेंड ही संस्कृती पुढे विकृत बनत असल्याने त्यापासून दूर राहावे, स्वत:चे जीवन समृद्ध करताना, इतरांचे जीवनही समृद्ध करण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले.
शिक्षण मंडळ कराड या संस्थेच्या टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांचे उद्घाटन व रजतरंग स्मरणिकेचे प्रकाशन अशा कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक व्ही. बी. पायमल अध्यक्षस्थानी होते, तर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मुकुंदराव कुलकर्णी, उपाध्यक्ष ल. रा. जाखलेकर, डॉ. एस. जी. सबनीस, मकरंद महाजन, तहसीलदार सुधाकर भोसले, प्राचार्य जी. जी. अहिरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
नीला सत्यनारायण म्हणाल्या, की लोकमान्य टिळकांसारख्या थोर व्यक्तीच्या विचारांचे व कार्याचे कवच या संस्थेला मिळाल्याची बाब मोलाची आहे. शहरी व ग्रामीण भागातूनही मुली येथे शिक्षणासाठी येतात. त्यांनी आता शहरात येऊन शहाणे बनावे. शिक्षणातून विचारांची क्रांती घडते. तरी, किमान कुटुंबाच्या दारिद्रय़ाचे चित्र बदलावे. मुलींच्या वर्तनाचे समाज सातत्याने निरीक्षण करीत असतो. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व, पर्यायाने समाजाचे आदर्श नीतितत्त्व घडत असते. स्पध्रेत ज्ञानाचा मार्ग चोखाळताना न्यूनगंड व भयगंडाला दूर ठेवल्यास यशाचा मार्ग निश्चितच सुकर होईल असा विश्वास त्यांनी दिला. सध्या शिक्षणाचे समाजावर प्रभावी पडसाद उमटत आहेत. मुली तर स्वत: पुढाकार घेऊन बालविवाह थांबवत असल्याने ही शिक्षणाचीच परिक्रांती म्हणावे लागेल. असे सांगताना, स्पर्धा परीक्षांना सामोरे जा, परंतु, मोठे होताना अन् इंग्रजी शिकताना मायबोली मराठीचा विसर पडू देऊ नका, संघटित रहा. आत्मविश्वासाने खंबीर जीवन जगा असेही आवाहन नीला सत्यनारायण यांनी केले.
व्ही. बी. पायमल म्हणाले, की आज मुली धाडसाने पुढे येऊन शिकत असल्याचा अभिमान वाटतो. ग्रामीण भागातील मुले घरापासूनच संघर्षांला सुरुवात करत असल्याने ती आयुष्याला सक्षमपणे सामोरे जातात. मुलींनी स्वहक्कासाठी व शिक्षणासाठी लढायला हवे. मुकुंदराव कुलकर्णी टिळकांच्या स्मरणार्थ शिक्षण मंडळाची स्थापना झाली असून, हा वटवृक्ष बहरला आहे. संस्था शतक महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. उत्तम गुणवत्ता व संस्काराच्या शिदोरीवर संस्थेचा शिक्षणप्रवास सुरू आहे. आजवर संस्थेने संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीला प्राधान्य दिले आहे. प्रास्ताविक डॉ. एस. जी. सबनीस यांनी केले.