नववर्षाच्या पूर्वसंध्येला अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्मशानभूमीत जाऊन ‘भुताचा शोध’ घेणार आहे. अंधश्रद्धेच्या मूळ संकल्पनेलाच छेद देण्याचा प्रयत्न या उपक्रमापाठीमागे असल्याचे डॉ. प्रदीप पाटील यांनी सांगितले.
थर्टी फर्स्ट डिसेंबरची रात्र स्मशानभूमीत जाऊन अंधश्रद्धेबद्दल जनतेमध्ये जागृती करण्याचा उपक्रम समितीने घेतला आहे. नवे वर्ष महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनासाठी प्रभावी असा जादूटोणाविरोधी कायदा घेऊन येत आहे. समाजातील अंधविश्वासाचे बळी रोखण्यासाठी या कायद्याचे सर्वानीच स्वागत करणे आवश्यक आहे. याकरिता अंनिस मिरजेतील स्मशानभूमीत नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेत आहेत.
मंगळवारी रात्री अंनिसचे कार्यकत्रे मधुकर पवार, सुजित काटे, अ‍ॅड. के. डी. िशदे, रवींद्र चव्हाण आदी स्मशानभूमीत चमत्काराचे आयोजन करणार आहेत. यामध्ये जळता कापूर तोंडात धरणे, खिळय़ाच्या पाटावर झोपणे, गळय़ातील चेनमध्ये भूत गाडणे आदी कार्यक्रम करून या पाठीमागील असणारे विज्ञान लोकांना उलगडून सांगणार आहेत.
जादूटोण्याची निर्मिती ज्या भूतपिशाच, वेताळ या कल्पनेशी निगडित आहे त्यांचे अस्तित्व स्मशानभूमीत व निर्जन ठिकाणी असते अशी पूर्वापार अंधश्रद्धा आहे. भूताबद्दलची समाजात असणारी भीती आणि गरसमज दूर होण्यासाठी कृतीची गरज लक्षात घेऊन मिरजेच्या स्मशानभूमीत अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे डॉ. प्रदीप पाटील यांनी सांगितले.