अनधिकृत बांधकामे, वाहतूक कोंडी, दळणवळण व्यवस्थेचा उडालेला बोजवारा यामुळे बदनाम झालेल्या मुंब्रा-कौसा तसेच कळवा परिसराला रिंगरुट सेवेचा आधार देण्याचे प्रयत्न सुरू झाले असून कळंबोली-मुंब्रा-कळवा-ऐरोली या मार्गावर वाहतुकीची नवी व्यवस्था उभी करता येईल का, याविषयीचे सर्वेक्षण आता सिडकोच्या माध्यमातून केले जाणार आहे. कळंबोली-तळोजापासून निघणारा महामार्ग शीळ-दिवा रस्त्यावरून थेट कौसा-मुंब्य्राच्या दिशेने निघतो. गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाहतूक कमालीची वाढली आहे. त्यामुळे ही रिंगरुट सेवा आर्थिकदृष्टय़ा किफायतशीर ठरू शकेल का, याचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे, अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी वृत्तान्तला दिली.
ठाणेकरांना वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी शहरात ट्राम गाडय़ा तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंदनगर ते घोडबंदर मार्गावर लाइट रेल ट्रान्सपोर्ट (एलआरटी) सुरू करण्याची घोषणा ठाणे महापालिकेचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी केली आहे. ठाणे रेल्वे स्थानक ते गोखले रोड आणि पुढे मूळ शहरात ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ा तसेच रिक्षांना प्रवेश द्यायचा नाही आणि ट्रामगाडय़ांचा पर्याय उपलब्ध करून द्यायचा, अशी संकल्पनाही राजीव यांनी मांडली आहे. हे नवे प्रकल्प प्रत्यक्षात उतरल्यास त्याचा सर्वाधिक फायदा मूळ शहर आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पश्चिमेकडील बाजूस विकसित होणाऱ्या नागरी वसाहतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना होणार आहे. मात्र, कळवा-मुंब्रा-कौसा या भागातील नागरिकांच्या पदरात फारसे काही पडणार नाही. त्यामुळे कळवा-मुंब्रा भागातही ट्राम तसेच एलआरटी सुरू करता येईल का, याची चाचपणी करावी, अशी अपेक्षा या भागातील स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. एलआरटी तसेच ट्रामसारखे प्रकल्प कोठे करावेत याविषयी वेगवेगळे मतप्रवाह उमटत असताना कळंबोली-मुंब्रा-कळवा-ऐरोली या मार्गावर एखादी िरगरुट सेवा सुरू करता येईल का, याविषयीची चाचपणी सिडकोने सुरू केल्याने या भागातील रहिवाशांसाठी ती खूशखबर ठरणार आहे.
 नवी मुंबई पोलिसांचे आयुक्तालय शीव-पनवेल महामार्गास लागून ज्या रोडपाली विभागात उभे राहिले आहे तेथून ही सेवा सुरू करता येऊ शकेल, असा सिडकोतील तज्ज्ञांचा प्राथमिक अंदाज आहे. रोडपाली, तळोजा भागातून पुढे शीळ-दिवामार्गे कौसा-मुंब्रा पुढे कळवा आणि पुन्हा ऐरोली अशा मार्गावर ही सेवा सुरू करता येऊ शकेल, अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी वृत्तान्तला दिली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंबंधीचा प्रस्ताव सिडकोपुढे ठेवला असून या प्रस्तावावर अभ्यास सुरू झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ऐरोलीपासून पुढे थेट कळंबोलीपर्यंत हा सेवेचा विस्तार केल्यास िरगरुटचा मार्ग पूर्ण होऊ शकणार आहे. मात्र, हा प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा किती किफायतशीर आहे हे पाहण्यासाठी लवकरच सर्वेक्षण हाती घेतले जाईल, असेही हिंदूराव यांनी स्पष्ट केले. या मार्गावर ठाणे तसेच नवी मुंबई महापालिकेची हद्द येते. त्यामुळे या भागातील आरक्षणांचाही सर्वेक्षण करताना विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्वेक्षण पूर्ण झाल्यावरच िरगरुटसाठी वाहतुकीचा कोणता पर्याय निवडला जावा, याविषयीचा सविस्तर अभ्यास केला जाईल, असेही हिंदूराव म्हणाले.