चारा, पाणी, रोजगार यांसह दलित अत्याचारास पायबंद घालण्यासंदर्भात सुधारणा न झाल्यास नऊ एप्रिलला मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे प्रणेते मनोज संसारे यांनी दिला आहे.
येथील विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेस संसारे यांसह पक्षाचे सचिव रवि जाधव, जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड उपस्थित होते. संसारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून भरकट चाललेल्या रिपाइं नेत्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने सर्व धर्मातील उपस्थितांच्या होणाऱ्या अडी अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-सेनाचे बाहुले रिपाइं नेत्यांनी बनू नये असे आवाहन संसारे यांनी केले. यावेळी त्यांनी थेट भुजबळांना लक्ष करीत चाऱ्यासंबंधी केवळ फलकबाजी करण्यात येत असल्याचा आरोप केला.
प्रत्यक्षात येवले तालुक्यात जनावरांना किती चारा आला, असा सवाल त्यांनी केला. तालुक्यातील दलितांवर अत्याचार होतात तेव्हा अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल होत नाही  दलितांवर दबाव आणला जातो. त्यांच्यावर दरोडय़ाचे खोटे दावे दाखल केले जातात. डॉ. आंबेडकरांच्या खऱ्या विचाराने समाजिक परिवर्तन घडविण्यासाठी सर्व दलितांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.