महिलांवरील अत्याचारांबाबत सध्या सर्वत्र गांभीर्याने मंथन होत असताना नांदेड जिल्ह्यात मात्र महिला शिक्षिकांना गेले काही दिवस मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकाला ‘अभय’ देण्याचा उद्योग जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यामुळेच अन्यायग्रस्त शिक्षिकांचा मानसिक कोंडमारा होत आहे.
जिल्ह्यात शिक्षक संघटनांमध्ये अनेकांची एकाधिकारशाही सुरू असते. अशांना वेळीच आवर घालण्याची जबाबदारी असताना शिक्षण विभागातील अधिकारी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याने या मंडळींचे मनोधर्य वाढतच चालले आहे. नांदेड शहराच्या इतवारा परिसरात जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत एका संघटनेचे पदाधिकारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या शाळेत कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. शहरातली शाळा असल्याने येथे महिलांना प्राधान्याने नियुक्ती दिली जाते, मात्र या मुख्याध्यापकाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली मनमानी, एकाधिकारशाही पदाधिकारी-अधिकाऱ्यांनाही थक्क करणारी आहे. महिला शिक्षिकांशी हे महाशय नेहमीच उद्धट बोलतात. प्रसंगी शिवीगाळ करतात, अशा तक्रारी आहेत. महिलांशी असभ्य वर्तणूक, शालेय पोषणआहार, उपस्थिती भत्ता, प्रोत्साहन भत्ता यांसारख्या योजनांमध्ये त्यांनी अपहार केल्याच्या लेखी तक्रारी याच शाळांमधील शिक्षकांनी केल्या.
या तक्रारीनंतर नांदेडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. शिक्षकांचे लेखी जबाबही घेतले. शिक्षकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचा स्पष्ट अहवाल देत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या चौंडे नामक मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस केली. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तातडीने कारवाई करतील, असे वाटत होते. परंतु राजकीय दबाव आल्याने चौंडे यांच्यावरील कारवाई प्रलंबित राहिली. काही जिल्हा परिषद सदस्यांनीही कारवाई होऊ नये, यासाठी दबाव आणला. दबाव आणणाऱ्यांनी महिला शिक्षिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच एवढय़ा गंभीर प्रकरणात अजून कोणत्याही कारवाईचे धाडस संबंधित अधिकाऱ्यांनी दाखवले नाही.
शाळेतल्या विधवा शिक्षिकेने पुराव्यानिशी तक्रार केली व न्यायासाठी वरिष्ठ कार्यालयाचे उंबरठे झिजवले, पण त्यांनाही अजून न्याय मिळाला नाही. संबंधित शिक्षिकेने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्याकडेही लेखी कैफियत मांडली. पण एरवी छोटय़ा-मोठय़ा प्रकरणात विशेष रुची दाखवणाऱ्या अध्यक्षांनी संबंधित महिलेच्या तक्रारीवर लक्ष देण्याचे औदार्य दाखवले नाही. न्याय न मिळाल्यामुळे शाळेतल्या शिक्षिका हतबल झाल्या आहेत. एका अपंग शिक्षिकेनेही या मुख्याध्यापकाच्या मनमानीबाबत लेखी तक्रार केली, पण तिलाही अजून न्याय मिळाला नाही. हे सर्व चित्र पाहता ‘भय इथले संपत नाही’ असे म्हणण्याची वेळ या शिक्षिकांवर आली आहे.