समुद्रकिनारा म्हटला की छोटय़ा छोटय़ा बोटी, जलक्रीडांचे सामान आदींचे स्वाभाविक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. पण या सगळ्यात गणिताची प्रयोगशाळा असली तर!!! थोडं विचित्र वाटेल. चौलच्या समुद्रकिनाऱ्यावर गणिताची प्रयोगशाळा उभारून तिथे गणित शिकवण्याचा अनोखा प्रकार नुकताच गावकऱ्यांनी पाहिला. निमित्त होते ‘सिद्धांत’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे. एरवी गणिताच्या वर्गाला दांडी मारणाऱ्या गावांतील पोरांनीही हे चित्रीकरण पाहण्यासाठी गर्दी केली. त्या वेळेस कदाचित अशी प्रयोगशाळा आम्हालाही असावी, असा विचारही त्यांच्या मनात शिवला असेल.
शाळेत असताना ‘गणित’ या विषयाचा बागुलबुवा सर्वानाच असतो. हातात गणिताचा पेपर पडताच कित्येकांना घाम फुटायला सुरुवात होते. पण हेच गणित सहजसोप्या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सांगितले, तर त्या विषयाची भीती निघून त्याचाही आनंद घेता येऊ शकतो. मुलांच्या मनातील गणिताची भीती काढून स्वत:हून छोटय़ा छोटय़ा प्रयोगांमधून गणित सोपे करण्याचा प्रयत्न मराठी चित्रपट ‘सिद्धांत’मध्ये करण्यात आला आहे.
गणितक्षेत्रामध्ये भारतीय गणितज्ञांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. केवळ वैज्ञानिक शोधांमध्येच नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यात गणिताचे स्थान महत्त्वाचे आहे. रोजच्या आयुष्यातील कित्येक गोष्टी गणितामुळे सोप्या होत असल्याचे चित्रपटाचे कला-दिग्दर्शक सिद्धार्थ ततोसकर सांगतात. चित्रपटानिमित्त संशोधन करत असताना भारतातील रामानुजनपासून ते माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलामांपर्यंत बहुतेक वैज्ञानिक किनारपट्टीच्या भागातूनच आलेले आहेत, हे लक्षात आले. याला जबाबदार येथे विकसित झालेली गुरुकुल पद्धती असू शकेल, हा त्यांचा अंदाज होता. तरीही आपल्याकडे गणिताचा बाऊ केला जातो. कारण गणितही आपल्याकडे सैद्धांतिक पद्धतीने शिकविले जाते. त्याऐवजी मुलांना छोटय़ा प्रयोगाच्या माध्यमातून गणितातील मजा शिकवली, तर हा कठीण विषयही सोप्पा होऊ शकतो. हाच या चित्रपटाचा विषय होता. जागतिक दर्जाच्या नामवंत गणितज्ञाची नातवाला गणित शिकविण्यासाठी धडपड हे या चित्रपटाचे कथानक असून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी गणितज्ञाची भूमिका साकारली आहे.
आपल्या देशात अजूनही गणिताच्या प्रयोगशाळांची संकल्पना रुजली नाही. काही मोजक्या नामवंत कॉलेजेसमध्ये अशा प्रयोगशाळा पाहायला मिळतात. पण पाश्चात्त्य देशात मात्र ही संकल्पना बऱ्यापैकी रुळली आहे. त्यामुळे हीच संकल्पना या चित्रपटाच्या माध्यमातून कोकणच्या किनारपट्टीवर साकारण्याचा प्रयत्न आमचा विचार होता असे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी चित्रपटाच्या सेटच्या दृष्टीने अनुकूल छोटय़ा प्रात्यक्षिकांवर आधारित चौलच्या किनाऱ्यावर हा सेट बनविला होता. ‘कल्पनाशक्ती’ हा या सेटचा मूळ असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटामध्ये नातवाला त्याच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर गणितातील कठीण उत्तरे सोप्पी करून दाखविण्याची खटाटोप आजोबा करत आहेत. यासाठी आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध लाकडाचे वासे, सुपाऱ्या, नारळाच्या पारंब्या, पारंपरिक कापडाचा वापर करण्यात आला आहे. या प्रयोगांमधून स्वावलंबनाचे धडे देण्याचाही प्रयत्न करण्यात आला असल्याचे ते सांगतात. एखादी समस्या सोडविण्यासाठी ठोकळेबाज पद्धती वापरण्याऐवजी त्यांना सोडविण्याची स्वत:ची पद्धत तयार करायला गणित शिकवतं आणि ती गंमत चित्रपटामध्ये छोटय़ा प्रयोगातून उलगडून दाखविली आहे. पाणी, वाळू यांचा वापर करून लिटर, किलो या परिमाणांमधील फरक समजावून सांगणे, वेगवेगळ्या आकाराच्या काडय़ा, डब्यांचा वापर करुन बेरीज, वजाबाकीच्या पद्धती समजावणे यासाठी विविध ठोकळे तयार करण्यात आले होते. विविध पद्धतीने जोडता येणारा ठोकळा असे साचे यासाठी करण्यात आले.