26 September 2020

News Flash

नव्या वर्षांत अंगणवाडय़ांमध्ये रूचकर आहार

अंगणवाडीतून रोज खिचडी व मुरमुऱ्यांचा चिवडा खाऊन कंटाळलेल्या बालकांना आता १ जानेवारीपासून अधिक रुचकर पदार्थ मिळणार आहेत. त्यासाठी पाकक्रियेत बदल करण्यात आले आहेत.

| December 19, 2012 05:15 am

अंगणवाडीतून रोज खिचडी व मुरमुऱ्यांचा चिवडा खाऊन कंटाळलेल्या बालकांना आता १ जानेवारीपासून अधिक रुचकर पदार्थ मिळणार आहेत. त्यासाठी पाकक्रियेत बदल करण्यात आले आहेत. ग्रामीण भागाच्या अंगणवाडीतील बालकांना गोड व तिखट लापशी, मसूर पुलाव, कडधान्याची उसळ, पौष्टिक खिचडी मिळणार आहे. जिल्हास्तरीय पूरक पोषण आहार समितीने आज हा निर्णय घेतला. स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीमुळे आहाराचा पुरवठा नाकारणाऱ्या अंगणवाडीत आता यापुढे सरकार धान्य पोहोच करेल, मात्र ते शिजवण्याची जबाबदारी सरकारने अंगणवाडी मदतनीसांवर टाकली आहे. त्यासाठी मदतनीसाला प्रति बालक ६० पैसे अनुदान दिले जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या सभेस महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती हर्षदा काकडे, समाजकल्याम सभापती प्रा. शाहूराव घुटे, प्रकल्प संचालक डॉ. वसंत गारुडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, तसेच जिल्ह्य़ातील बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये आहारात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाष्टा व जेवणातून बालकांना ५०० कॅलरिज व १८ ते २० ग्रॅम प्रथिने उपलब्ध करण्याचे बंधन आहे, हे प्रमाण बदललेल्या पाकक्रियेतून राखले जाणार आहे. सध्या अंगणवाडीतील बालकांना सकाळी नाष्टय़ाला मुरमुऱ्याचा चिवडा दिला जात होता.
स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढल्याने अंगणवाडींना आहार पुरवठा करणाऱ्या साडेचार हजारपैकी ९१३ महिला बचतगटांनी हे काम परवडत नसल्याचे सांगत नाकारले आहे. त्यामुळे सध्याच किमान ३०० ठिकाणी आहार शिजवण्याचे काम मदतनीसकडेच आहे. लोकसहभाग किंवा ग्रामपंचायतीने केलेली मदत या माध्यमातून हे काम सुरु आहे, तीन ठिकाणच्या अंगणवाडय़ांतील बालकांना आहार मिळत नाही. बचतगटांना पर्याय म्हणून सरकारने नगर जिल्ह्य़ासाठी धान्य पुरवण्याचा ठेका समृद्धी औद्योगिक सहकारी महिला संस्था (नागपूर) व प्रियंका सहकारी महिला संस्थेस दिला आहे. महिला बचतगटास धान्य खरेदीसह ते शिजवून आहार देण्यासाठी सरकार ४ रुपये ९२ पैसे अनुदान देत होते.
महिला बचतगटांनी काम नाकारल्याची खातरजमा करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या फलकावर नोटीस लावण्याची सूचना श्रीमती काकडे यांनी केली. त्यानंतरच तेथे धान्य पोहोच केले जाणार आहे.     
माता तपासणार दर्जा
अंगणवाडीतील आहाराचा दर्जा तपासण्याची जबाबदारी आता माता संघावर सोपवण्यात आली आहे. अंगणवाडीतील बालकांच्याच या माता असतील. संघाच्या सदस्या रोज आहार तपासतील. मातांनी आहार शिजवण्याच्या कामात सहभाग दिल्यास दर्जा चांगला राखण्यास मदत होईल, अशी सूचना करण्यात आली.
अनुदान वाढीचा ठराव
महिला बचतगटांनी आहार शिजवण्याचे काम नाकारल्यास, तेथे आहार शिजवण्याचे काम मदतनीसास करावे लागणार आहे, त्यासाठी मिळणारे प्रती बालक ६० पैसे अनुदान कमी असल्याने त्यात वाढ करुन प्रती बालक १ रुपया अनुदान मिळावे, असा ठराव सभापती काकडे यांनी मांडला. तो मान्य करण्यात आला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 5:15 am

Web Title: teasty food in anganwadi from new year
Next Stories
1 शैक्षणिक कर्जात अडथळेच अधिक..
2 अभियांत्रिकी ‘निकाला’ची चौकशी होणार
3 बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी परवडणाऱ्या घरांची योजना आणा
Just Now!
X