उरण तालुक्यातील १० वर्षीय राज पाटील याने गुरुवारी वाशी ते गेटवे हे २६ किलोमीटरचे सागरी अंतर ६ तास २४ मिनिट २१ सेकंदांत पार करण्याची कामगिरी केली आहे. राजचे वडील संतोष पाटील यांनी अनेक जलतरण पटूंना प्रशिक्षण दिलेले आहे. केगाव दांडासारख्या छोटय़ा खेडय़ातून थेट अमेरिका, स्पेन व जपानमध्ये जाऊन खडतर खाडय़ा व समुद्र संतोष पाटील यांनी पार केल्या आहेत. त्यांच्या मुलगा राज यालाही पोहण्याची विलक्षण आवड आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजता वाशी येथून राज याने हे सागरी अंतर कापण्यास सुरुवात केली. रात्रीच्या वेळेत बोटीच्या उजेडाच्या अंदाजाने अंतर कापत सकाळी दहा वाजताच्या सुमारास राज याने गेटवे गाठले. तेथे त्याचा महाराष्ट्र अम्युचर अ‍ॅथेलिट असोसिएशनने प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार केला. आर्थिक अडचणींवर मात करीत जगातील अनेक देशांत जाऊन कठीण व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत विक्रम करण्याचा प्रयत्न आपण केला आहे, आपल्या मुलाला प्रशिक्षण देऊन आपल्याप्रमाणे या क्षेत्रात जगात नाव कमवावे, असा विश्वास राजचे वडील संतोष पाटील यांनी व्यक्त केला.