पुढील चारपाच महिन्यांच्या पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या टँकरच्या निविदा आज दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फोडण्यात आल्या. मात्र तीनपेक्षा कमी निविदा आल्यामुळे बारा तालुक्यांमधील निविदांना मुदतवाढ दिली जाणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या उपस्थितीत आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पाण्याच्या टँकरसाठीच्या निविदा फोडण्यात आल्या. त्यात जामखेड व पारनेर वगळता अन्य सर्व तालुक्यांसाठी तीन पेक्षा कमी निविदा प्राप्त झाल्या. स्पर्धा होत नसल्यामुळे या सर्व म्हणजे १२ तालुक्यांसाठी निविदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय डॉ. संजीवकुमार यांनी घेतला.
जामखेड व पारनेर या तालुक्यांसाठी तीन पेक्षा जास्त निविदा आल्या, मात्र त्यांचे दर एकसारखेच होते. त्यात काहीही फरक नव्हता. त्यामुळे त्या सर्व निविदाधारकांना बोलावून घ्यावे व जो दर कमी करेल त्याला काम द्यावे असे ठरवण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव उपस्थित होते.