ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागाच्या लोकसंख्येची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी माधवराव चितळे समितीने प्रस्तावीत केलेल्या योजनांपैकी एकही नवा धरण प्रकल्प मार्गी लागला नसल्याने चिंतेचे वातावरण असताना अतिरिक्त पाणीपुरवठय़ाचे एकमेव आशास्थान असणाऱ्या बारवी धरणातून पुढील वर्षांपासून निश्चितपणे किमान ३० टक्के जादा पाणीपुरवठा होणार असल्याने येथील नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.
मुरबाड तालुक्यातील बारवी धरणातून सध्या ठाणे जिल्ह्य़ातील नागरी वस्त्या तसेच औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या दहा वर्षांपासून या धरणाची विस्तारीकरण योजना पुनर्वसन पॅकेजवरून ग्रामस्थ तसेच एमआयडीसी प्रशासनात एकमत होत नसल्याने रखडली होती. गेल्या वर्षी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी मध्यस्थी करून हा पेच सोडविला. सध्या बारवी धरणात कमाल १७८ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता आहे. विस्तारीकरण प्रकल्पात धरणाची उंची सहा मीटरने वाढवली असल्याने हा जलसाठा जवळपास दुप्पट म्हणजे ३४० दशलक्ष घनलिटर्स होणार आहे. थोडक्यात ठाणे जिल्ह्य़ातील रहिवाशांसाठी एक नवे धरणच उपलब्ध होणार आहे. ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागासाठी प्रस्तावीत केलेली मुरबाड तालुक्यातील काळू आणि शाई ही दोन्ही धरणे अद्याप कागदावरच आहेत. विविध कारणांनी या दोन्ही धरणांच्या कामांना स्थानिकांचा विरोध आहे. गेल्या वर्षी पाण्याचा प्रश्न असल्याने आवश्यक त्या परवानग्या मिळतीलच, असे गृहीत धरून संबंधित कंत्राटदाराने धरणाचे काम सुरूही केले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशाने ही कामे आता ठप्प आहेत. चितळे समितीने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार या धरणांची कामे २००५ मध्ये सुरू होऊन २०१६ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र गेली आठ वर्षे शासकीय यंत्रणा स्थानिकांची मने वळवू शकलेली नाही. मागच्या अनुभवावरून शहाणे झालेल्या ग्रामस्थांचा धरणांना तीव्र विरोध आहे. संबंधित सर्व गावांनी आपापल्या ग्रामसभांमध्ये धरणविरोधी ठराव करून शासनास पाठविला आहे.  
या पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्ह्य़ातील वाढत्या शहरीकरणास बारवी विस्तारीकरण मार्गी लागल्याने दिलासा मिळणार आहे. सध्या झडपा बसविणे तसेच इतर किरकोळ कामे बाकी आहेत. लवकरच ही कामे सुरू होतील. ती कामे पूर्ण व्हायला सात-आठ महिने लागणार आहेत. तरीही येत्या पावसाळ्यात बारवी धरणात किमान ३० टक्के जादा जलसाठा उपलब्ध होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. २०१४ च्या पावसाळ्यात मात्र या धरणात निश्चितपणे दुप्पट जलसाठा होईल, असा विश्वासही संबंधितांनी व्यक्त केला आहे.