सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयात सध्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कलाप्रदर्शन भरले आहे. नव्या पिढीचा आधुनिक कलाविष्कार येथे पाहायला मिळतो. या प्रदर्शनात बीएफएच्या स्वागत शेलारला प्रथम पुरस्कार, निकिता यावलकरला द्वितीय व अभिजित सोनावनेला तृतीय पुरस्कार मिळाला आहे.
स्वागतने ‘कॅम्लिन’च्या जाहिराती व ‘यंत्रमानव’चे मॉडेल तयार केले आहे. निकिताने औरंगाबाद येथील बॅकस्टेजच्या कलाकारांची व्यथा चित्रांमधून मांडली आहे. अभिजितने ‘अमेरिकन टय़ूरिस्ट बॅगसोबत खेळणारी मुले’ छायाचित्रांमध्ये टिपली आहेत. शरद गरोळेने कुंभमेळ्यातील साधूंची चित्रे दिनदर्शिकेतून मांडली आहेत.  विशाल कांबळीच्या टायपोग्राफीला पुरस्कार मिळाला आहे. किशोर जाधवचे ‘भारत स्वच्छता अभियान’ घरातील अस्वच्छता दर्शविते. सिद्धेश शिर्सेकरने केरळमधील मांजरपाटवरील शिलाईमधून युद्ध-शांतता, एचआयव्ही-कंडोम यावरचा संदेश दिला आहे. लीना मुर्डेश्वर हिने सत्यप्रकाश तिवारी, विक्रम अधिकारी, मार्ग धर्मा, विभास सेन, योगेश पाल, कार्तिकी पटेल या अपंग खेळाडूंच्या व्यथा प्रदर्शनात मांडल्या आहेत. अभिजित बनाफरने ‘टाटा फोटॉन’वर कॅम्पेन केले आहे.   चेतन पाटीलची आवेशपूर्ण रेखाचित्रे, विनोद आढावचे  ‘प्राणी संगोपन’, एमएफएच्या संतोष भिसेने रेखाटलेली पुरातन संस्कृती, मनोहर गुंजाळचे ‘कविसंमेलन’ वेधक झाली आहेत. हे कलाप्रदर्शन ज.जी. उपयोजित कला महाविद्यालय, तळमजला, मुंबई सीएसटी येथे  मंगळवार, २४ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान पाहायला मिळेल.