19 September 2020

News Flash

द व्हिलेज.. चला गावाला..

डेरेदार वृक्ष, पसरलेल्या फांद्या, त्यावर लटकलेले सुगरण पक्ष्याचे घरटे, खाली गवताने साकारलेले छोटे लाकडी घर, घरातील कंदील, सांजवेळी बैलगाडीने घरी परतत असलेला शेतकरी. हे छान

| March 31, 2013 12:03 pm

डेरेदार वृक्ष, पसरलेल्या फांद्या, त्यावर लटकलेले सुगरण पक्ष्याचे घरटे, खाली गवताने साकारलेले छोटे लाकडी घर, घरातील कंदील, सांजवेळी बैलगाडीने घरी परतत असलेला शेतकरी. हे छान रम्य अशा कोकणातील गावाचे वर्णन नसून प्रत्यक्ष हे गाव साकारले आहे ‘द व्हिलेज’मध्ये. खास कोस्टल क्युझिन म्हणजे सागर किनाऱ्यावरील गावांमधील पदार्थाची अस्सल चव देणाऱ्या या रेस्टॉरण्टमध्ये.
ग्रामीण वातावरणाला साजेसे फर्निचर, खास बनविलेली तांब्याची भांडी आणि ताजे सी फूड आपल्यासाठी पेश करणारे हे रेस्टॉरण्ट नुकतेच खांदेश्वर रेल्वे स्थानकापासून जवळच कामोठे से. २१ येथे सुरू झाले आहे.
या गावात आल्यानंतर आपल्याला मेनू कार्डपासूनच याचे वेगळेपण दिसून येते. मेनू कार्डवरच लिहिले आहे, मत्स्यगंधा एक्स्प्रेस. कोकण, गोवा, कारवारपासून मेंगलोपर्यंतच्या सर्व स्थानकांवर थांबणारी ही एक्स्प्रेस या सर्व ठिकाणचे अस्सल पदार्थ आपल्यासाठी घेऊन आली आहे. प्रथम रत्नागिरी येथे थांबणारी ही एक्स्प्रेस आपल्यासाठी वेलकम ड्रिंक म्हणून कैरीचे पन्हे घेऊन येणारी, सोबत काजू कन्ही घातलेली कोंथीबिर वडी तसेच पुढे कोकणी मसाल्यातील भरपूर खोबरे, कोथिंबीर आणि थोडी चिंच घालून बनविलेले कोळंबीचे आंबट, तसेच क्रॅब रत्नागिरी असे अनेक रत्नागिरीच्या चवीचे खाद्यपदार्थ पेश करते. यामध्ये शाकाहारींसाठी खास काजूची आमटीदेखील आहे आणि भरलेली वांगीसुद्धा.
थोडे पुढे गेल्यास येते, मालवण. तेथील भाजणीचे गरमागरम वडे व कोंबडीची सागुती आणि खोबऱ्याचे दूध, आमसुलाचा कोळ घातलेली सोलकढी म्हणजे रसना तृप्तीच. आलं, लसूण, लवंग, त्रिफळा घालून सोबत खोबऱ्याचे हिरवे वाटण असा मसाला भरलेले हिरव्या मसाल्यातील पापलेट तर खासच. याचबरोबर कोळंबीचा खिमा आणि हिरवा मसाला आत भरलेले स्टफ पापलेट एक वेगळीच मजा देते. मालवणी मसाल्यातील तिसऱ्या मसाला हे या रेस्टॉरंटचे वैशिष्टय़च.
मालवणातून थोडे पुढे गोव्याकडे जाऊ. स्टार्टरमध्ये मिळणारे प्रॉन्स कॉफरेल टेस्ट कराच. पालक, पुदिना, कोथिंबीर, काजूबरोबर थोडी रमही यात वापरली जाते बरं का आणि तांदळाचे पीठ, मैदा, बेसन अंडय़ामध्ये घोळवून बनविलेली बोंबील भजी म्हणजे गोवन मेजवानीची सुरुवातच. गोवन मसाल्यातील प्रॉन्स गोवन करी असो किंवा चिकन शाकुटी हे सर्व आपल्याला गोव्यामध्येच थांबवून ठेवतात; पण थांबून कसे चालेल, कारण पुढे कारवारी मसाल्यातील कारवारी पदार्थ आपली वाट पाहत असतात. यातील कारवारी पापलेट आवर्जून खाण्यासारखे.
येट्टी अजादीना आणि अप्पम म्हणजे मेंगलोर आले, असे समजावे. येट्टी अजादीना म्हणजे खास मेंगलोरी मसाल्यातील कोळंबी, गरमागरम अप्पमबरोबर छानच लागते. मेंगलोरी मसाला, चिंच, काजू-खोबऱ्याचे वाटण, कढीपत्ता आणि कसुरी मेथी घातलेली सुरमईची मंगलोरियन सीर फिश करीबरोबर नीर डोसा किंवा स्टीम राइस म्हणजे मेंगलोरी जेवणाचा हाय पॉइंट. मेंगलोरी मसाल्याची चवच वेगळी. या मसाल्यातील फिश करी असो किंवा फ्राय फिश आपल्याला हा खाद्य प्रवास वारंवार करायला लावतात.याशिवाय तळलेली सुकी मिरची, कढीपत्ता, गरम मसाले आणि काजू-खोबरे यांचा सढळ वापर करून बनविलेले चिकन कुंदापुरा शिवाय हा खाद्य प्रवास पूर्ण होऊच शकत नाही. याशिवाय तंजावरी क्रॅब असो किंवा खास तामिळनाडूतील वैशिष्टय़पूर्ण हिरव्या मसाल्यातील सर्व पदार्थ आपल्याला या प्रदेशांच्या वैशिष्टय़पूर्ण चवींसह येथे उपलब्ध आहेत. याशिवाय इंडियन, चायनीज, कबाब, तंदुरी, बिर्याणीही आपल्यासाठी हजर आहेतच.
द व्हिलेज या थीम रेस्टॉरंटमध्ये एका वेळी ११० व्यक्तींची व्यवस्था केली जाते. आपण येथे पार्टीही आयोजित करू शकता आणि हे पदार्थ आपल्याला घरपोच हवे असतील तर पाच किलोमीटर्सच्या परिसरात मोफत होम डिलिव्हरीचीही सोय करण्यात आली आहे.
द व्हिलेजमधील या गावाला एकदा जरूर भेट द्या आणि भारताच्या किनारपट्टीवरील वैविध्यपूर्ण चवींचा आनंद जरूर अनुभवाच.
संपर्क- द व्हिलेज.. कोहिनूर बिल्डिंग, प्लॉट २५, सेक्टर २१, कामोठे, नवी मुंबई फोन- ०२२ ६५६६६६२९, ९३२१३३३०३०
    -समीर म्हात्रे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 12:03 pm

Web Title: the village restaurant
Next Stories
1 ‘हिम्मतवाल्या’ बिनडोक प्रेक्षकांसाठी..
2 नात्यांचा गडबडगुंडा दर्शविणारा ‘संशयकल्लोळ’ शुक्रवारी येतोय
3 ‘राजभाषा’ चित्रपटात ‘स्पेशल २१’
Just Now!
X