वडझिरे येथील शिवडोह तलावात बुडालेल्या सुदर्शन आवारी या तिस-या तरुणाचा मृतदेह आज सकाळी पाण्याबाहेर आल्याने ही मोहीम राबविणारे राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेचे जवान तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने अखेर सुटकेचा नि:श्वास टाकला.
वडझिरे गावाजवळून वाहणा-या पाडळी नदीला आलेल्या पुरात मारुती व्हॅन घालून नदी पार करणारे सुदर्शन आवारी (रा. रांधे), अवधूत परंडवाल (रा. आळकुटी) व बोअरवेलचा व्यवसाय करणारा तामिळनाडूतील बालू मुरूगन हे पंचविशीतील तरुण गुरुवारी वाहून गेले होते. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडल्याने त्या रात्री काहीही बचावकार्य करता आले नाही.
तीन दिवसांच्या शोधकार्यानंतर रविवारी सकाळीच बालू मुरूगन याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास अवधूत परंडवाल याचाही मृतदेह पाण्यावर आला. दोघांच्याही मृतदेहांचे तलावाच्या काठी शवविच्छेदन करण्यात येऊन ते नातलगांच्या ताब्यात देण्यात आले. राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेच्या पथकाने शनिवारपासून तलावातील पाणी घुसळण्यास प्रारंभ केला होता. त्यामुळेच हे दोन मृतदेह वर आले.
मात्र सुदर्शन आवारी याचा मृतदेह राहिल्याने सर्व यंत्रणा तणावाखाली असताना, आज दिवसभर शोधकार्य करून मोहीम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्पूर्वी सकाळीच सुदर्शन याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. यंत्रणेच्या जवानांनी तो पाण्याबाहेर काढला. तेथेच शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर रांधे येथे शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या संपूर्ण शोध मोहिमेदरम्यान प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार जयसिंग वळवी, पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर यांनी घटनास्थळी ठिय्या दिला होता.
 तलावातील पाणी वाचले
मृतदेह शोधण्यासाठी तलावातील पाणी सोडून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर वडझिरे परिसरातील लोकांनी त्यास आक्षेप घेत पाणी न सोडताच मृतदेह शोधण्याचा हट्ट धरला होता. मात्र ते कठीण असल्याचे समजल्यानंतर तलावातून मोठय़ा प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. तिसरा मृतदेह सापडल्यानंतर आज सकाळी हे पाणी बंद करण्यात आले. सगळे पाणी वाहून जाण्यापूर्वीच मृतदेह हाती लागल्याने वडझिरे परिसरातील सिंचनात वाढ होण्यास मदत होणार आहे.