संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात बेकायदेशीररित्या सेतूचे कार्यालय सुरु करणे महसूल प्रशासनाच्या चांगलेच अंगलट आले. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रिवद्र पाटील यांनी चौकशीचे आदेश देताच गुरुवारी दुपारी घाईघाईने सेतू कार्यालय बंद करण्यात आले. दरम्यान संबधितांचे मोबाईल नॉट रिचेबल झाल्याने सेतू कार्यालय कोणाच्या आदेशावरुन बंद करण्यात आले याची माहिती उपलब्ध झाली नाही. पंचायत समितीच्या ताब्यात असलेल्या जुन्या इमारतीतील सभागृहाचा शनिवारी ताबा घेऊन तेथे सेतूचे कार्यालय सुरु करण्यात आले होते. पंचायत समितीतील विरोधी पक्षनेते सरुनाथ उंबरकर यांनी संबंधितांवर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने उंबरकर यांनी बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता दिलीप पालवे यांना चौकशीसाठी नेमले.
आज दुपारनंतर या सेतू कार्यालयाला कुलूप बघून कामानिमित्त आलेल्या अनेकांना माघारी फिरावे लागले. उंबरकर यांनी सेतू कार्यालय बंद करुन नागरिकांची गैरसोय करण्याऐवजी सेतू कार्यालयासाठी तहसिलदारांनी नव्याने बांधलेल्या यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली असून संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशीअंती कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा आपला निर्णय कायम असल्याचे सांगितले.