सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपावरून शिवसेना आमदार संजय जाधव यांना न्यायालयाने दोषी ठरवून तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा व २५ हजार रुपये दंड ठोठावला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सईद यांनी हा निकाल दिला.
अडीच वर्षांपूर्वी महावितरणच्या कार्यालयात जाधव व महावितरणचे अधिकारी यांच्यात वाद झाला होता. परभणी मतदारसंघातील मुरुंबा येथील काही शेतकरी रोहित्र मिळावे, ही मागणी घेऊन महावितरणच्या कार्यालयात गेले होते. रोहित्राबाबत शेतकऱ्यांनी जाधव यांना माहिती दिली. जाधव यांनी संबंधित अभियंत्याशी मोबाईलवर संपर्क साधला. परंतु अभियंत्याने जाधव यांना मोबाईलवर उद्धट उत्तर दिले. आपण बठकीत आहोत. तुम्ही नंतर फोन करा, असे सांगितले. शेतकरी महावितरण कार्यालयातून निघून गेले. त्यानंतर जाधव तेथे पोहोचले. त्या वेळी संबंधित अभियंता व जाधव यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर या खटल्याची न्यायमूर्ती सईद यांच्यासमोर सुनावणी होऊन शुक्रवारी जाधव यांना वरील शिक्षा सुनावली गेली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. सोनटक्के यांनी काम पाहिले.