दीपावलीत फटाक्यांची आतषबाजी होणे, यात नवल ते काय. परंतु दीपावलीनंतर येणाऱ्या तुळशी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी एक उत्सव व परंपरा म्हणून एकमेकांच्या अंगावर फटाके फेकण्याचा आनंद कुठे घेतला जात असेल तर..
कोजागिरी पौर्णिमेला होणाऱ्या अनोख्या रासक्रीडा उत्सवासाठी प्रसिध्द असलेल्या सटाणा तालुक्यातील मुल्हेर येथे तुळशी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांवर फटाके फेकण्याची रोमहर्षक आणि थरारक परंपरा उत्सवाच्या स्वरूपात आजही पाळली जात आहे. सोमवारी रात्री उत्साहात या उत्सवाचा आनंद परिसरातील ग्रामस्थांनी घेतला. अर्थात या उत्सवासाठीही धार्मिक अधिष्ठान लाभलेले. उत्सवाची तयारीही जोरदार. रस्त्यावर ठिकठिकाणी कुंकूमार्जन..रांगोळ्या. फुलांच्या पायघडय़ा.श्रीकृष्ण आणि भगवान शंकर यांच्या नावे सुरू असलेला नामघोष.. देवादिकांच्या मिरवणुकीसाठी काढण्यात आलेली रथयात्रा आणि यात्रेत सामील झालेल्या भक्तगणांच्या अंगावर टाकण्यात येणाऱ्या फटाक्याच्या लडी, हे सारं काही या उत्सवात पाहावयास मिळाले.
साधारणत साडेतीनशे वर्षांपासून उध्दव महाराजांच्या काळापासून देवदिवाळी हा उत्सव मुल्हेर येथे साजरा करण्यात येत आहे. कार्तिक शुध्द एकादशीपासून उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरूवात होते. यावेळी एकादशीला देवांचे ‘उत्थापन’ म्हणजे त्यांना हलविण्यात येते. या दिवसाचे औचित्य साधत उध्दव महाराजांच्या घरापासून रथयात्रा काढण्यात येत असे. द्वादशीला तुळशीविवाह असे या उत्सवाचे स्वरूप होते. मात्र उध्दव महाराजांच्या निर्वाणानंतर उत्सवाचे रुप बदलले. एकादशीच्या दिवशी निघणारा रथ हा त्रयोदशीला म्हणजे उध्दव महाराजांच्या महानिर्वाण दिनी काढण्यात येऊ लागला. मात्र द्वादशीला तुळशी विवाह नियमितपणे होत आहे. यंदाही रविवारी सकाळी सहा वाजता उध्दव महाराजांच्या घरापासून रथयात्रेस सुरूवात झाली. रथाचा पहिला मानकरी हा मुस्लिम समाजाचा होता. त्यास मानाचा फटका व नारळ देण्यात आले. यानंतर विविध जातीजमातीतील जे लोक रथाचे मानकरी होते, त्यांच्या हस्ते रथाचे विधीवत पूजन करण्यात आले. रथावर उध्दव महाराजांचा मुखवटा, त्यांची प्रतिमा,  काठी व पादुका यांची स्थापना करण्यात आली. रथ गावातून फिरत असतांना ठिकठिकाणी कुंकवाचे सडे, रथाच्या मार्गावर फुलांच्या पायघडय़ांसह फटाक्यांची आतिशबाजीही करण्यात आली. या जल्लोशपूर्ण व उत्साही वातावरणात निघालेला रथ दुपारी एक वाजता उध्दव महाराजांच्या समाधी स्थळांपर्यंत आल्यानंतर त्याचे पूजन करण्यात आले. आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करून रथयात्रेचा समारोप झाला.
दुसऱ्या दिवशी सायंकाळनंतर हरिहर भेट महोत्सवासाठी निघणारा रथ हा रात्री अकरा वाजता समाधी स्थळापासून निघून देवघरात सकाळी सहा वाजता परतायचा. मात्र रघुराज महाराजांनी हा रथ सायंकाळी सात वाजता उध्दव महाराजांच्या समाधी स्थळापासून सुरू करून रात्री दोन वाजता महाराजांच्या घरात म्हणजे देवघरात नेण्याचे नियोजन केले. यंदाही त्रयोदशीला सायंकाळी सात वाजता रथयात्रेला विधीवत सुरूवात झाली. या रथावर भगवान शंकर, भगवान विष्णू आणि उजव्या सोंडेचा गणपती यांच्या मूर्ती विराजमान करण्यात आल्या. रथयात्रेचे वेगळेपण म्हणजे या रथाचे स्वागत करण्यासाठी फुलांची उधळण होते, त्याप्रमाणे पेटत्या फटाक्यांची उधळण एकमेकांच्या अंगावर होते. आजवर कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने ही प्रथा सुरू सुरू आहे. एकमेकांवर फटाके उधळण्याची ही प्रथा नेमकी केव्हा आणि कशी सुरू झाली याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नसल्याचे किशोर पंडित महाराज यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. याशिवाय रथाचे ज्या ज्या ठिकाणी पूजन होते त्यांसह रथाचे सारथ्य करणाऱ्यांच्या, आदरतिथ्य करणाऱ्यांच्या घरांमध्येही फटाके फेकले जातात. फटाक्यांच्या आतिशबाजीमुळे हा रथ जणूकाही अग्निज्वालातून पुढे जात असल्याचा उपस्थितांना भास होत असल्याचेही महाराजांनी सांगितले.