महापालिकेतील सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पहिलीच अधिकृत चर्चा उद्या (सोमवारी) होत आहे. दरम्यान, या संदर्भात काँग्रेस पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही पक्षाच्या नगरसेवकांना उद्याच लोणी येथे निमंत्रित केल्याचे समजले. पक्षाच्या काही नगरसेवकांनी रविवारी माजी महापौर संदीप कोतकर यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन गटनेतेपद स्वीकारण्याची गळ घातली.
महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी सर्वच पक्षांत हळूहळू वेग येऊ लागला आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादीने सत्ता मिळवण्यासाठीचे संख्याबळ (३५) ओलांडल्याचा दावा केला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेचेही प्रयत्न असले तरी भाजपबरोबर त्यांच्या कुरघोडय़ा सुरूच असल्याने त्याबाबत मर्यादा पडत चालल्याचे स्पष्ट होत आहे.
काँग्रेस आघाडीमध्ये ज्याचे संख्याबळ अधिक त्याला महापौरपद असे सूत्र ठरलेले असले तरी आता सत्तास्थापनेबाबत विखे यांनीही लक्ष घातल्याने याला काही वेगळे वळण मिळते का, याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसमधील कोतकर गट आता विखेंकडे गेल्याने राष्ट्रवादीही या घडामोडीकडे लक्ष ठेवून आहे. त्यामुळेच काँग्रेसची भूमिका ठरवण्यासाठी व त्याबाबत नगरसेवकांची मते जाणून घेण्यासाठी विखे यांनी नगरसेवकांना चर्चेसाठी सोमवारी सकाळी लोणी येथे निमंत्रित केले आहे.
मनपा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापण्याबाबत राष्ट्रवादी व काँग्रेस या दोघांत सोमवारी प्रथमच अधिकृत चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपुढे काय पर्याय ठेवणार हेही उद्याच स्पष्ट होणार आहे. यापूर्वी मनपामध्ये सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादीमागे काँग्रेसला फरफटत जावे लागल्याची पक्षाच्या नगरसेवकांची भावना होती. तशी फरफट यंदा होऊ नये अशी नगरसेवकांची अपेक्षा आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होण्यासाठी कोणता पर्याय देते याकडे काँग्रेसचे पदाधिकारी लक्ष ठेवून आहेत.
माजी महापौर संदीप कोतकर लांडे खूनप्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीमुळे नगरमध्ये होते. काही नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली. कोतकर यांनी गटनेतेपद स्वीकारावे अशी गळ नगरसेवकांनी घातल्याचे समजले.