भोगवटा प्रमाणपत्र देण्याआधी छतावरून पडणाऱ्या पावसाचे पुनर्भरण केले जावे, अशी अट महापालिकेने सर्व विकसकांना घालावी. महापालिकेने स्वमालकीच्या इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता महापालिकेसमोर निदर्शने केली जाणार आहेत.
महापालिकेच्या नव्या व जुन्या इमारतींवरही छतावर पडणाऱ्या पावसाचे पुनर्भरणाची सोय नाही. महापालिकेला शक्य नसेल, तर मनसेला तशी परवानगी दिल्यास मनपाच्या मुख्य इमारतीवर ही उपाययोजना आम्ही करून देऊ, असेही मनसेने पत्रकात म्हटले आहे. जिल्हा परिषद, उच्च न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या इमारतींवरील जलपुनर्भरणाच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जात आहेत. केवळ महापालिकेच्या इमारतीवर अशी कामे सुरू नाहीत. महापालिकेच्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन करणार असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, अरविंद धीवर, डॉ. शिवाजी कान्हेरे यांनी सांगितले.