राज्याची उपराजधानी नागपूर शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
सुमारे २५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरातील वाहनांची संख्याही वाढली असून रस्त्यावरून मिनिटाला सरासरी शेकडो वाहने रोज धावतात. मात्र, शहरातील वाहतुकीला बेशिस्त लागल्याचे चित्र शहरातील कुठल्याही भागात गेले तरी दिसते. गणेशपेठेतील मध्यवर्ती बस स्थानकासमोर रस्त्यावर फेरीवाल्यांचे आधीच अतिक्रमण झाले आहे. त्यातच रिक्षा, ऑटो रिक्षा आणि इतर वाहने रस्त्यावरच थांबत असतात. मध्यवर्ती बस स्थानकातून दर मिनिटाला एक बस आत जाते व बाहेर पडते. आधीच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा असल्याने या बस स्थानकासमोर वाहतूक जाम झाल्याचे चित्र सदोदित असते. जाधव चौकानजिक खासगी बसेस उभ्या असतात. मध्यवर्ती बस स्थानकापासून दोनशे मिटरच्या आत खासगी बसेस सर्रास उभ्या असतात. बैद्यनाथ चौकातही बसेस उभ्या असल्याने ग्रेट नाग रोडवरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो.
शहराच्या मध्य भागातील झाशी राणी चौक ते आनंद टॉकीजदरम्यानचा रस्ता अतिवर्दळीचा असून रस्त्याच्या कडेला दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी असल्याने आधीच अरुंद रस्ता आणखी अरुंद होतो. त्यामुळे वाहतुकीला अडथळा सदोदित असून कासवाच्या गतीने येथून वाहने चालवावी लागतात. पदपथ शिल्लकच नसल्याने पादचाऱ्यांनी जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. सोमवार व गुरुवारच्या दिवशी साप्ताहिक बाजार असल्याने वाहतुकीची सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कोंडी कायम असते. सदरमधील लिबर्टी टॉकीज ते राजभवनपर्यंतच्या रेसिडन्सी रोडवरही दुतर्फा दुचाकींच्या पार्किंगमुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा होतो. सायंकाळनंतर वाहने मुंगीच्या पावलाने सरकत असतात. मुंजे चौक ते मेहाडिया चौकादरम्यान रस्त्याच्या कडेला हातगाडीवाले आणि ऑटो रिक्षा चालक गर्दीने उभे असतात. मेयो रुग्णालय ते सतरंजीपुरा हा जुना भंडारा रोड, गांधीबाग उद्यान ते निकालस मंदिर रस्ता, शहीद चौक ते गांधी पुतळा चौक, भंडारा मार्गावरील गोमती चौक ते पारडी नाका रस्ता, कमला नेहरू महाविद्यालय ते ईश्वर देशमुख महाविद्यालय, ऑरेंट सिटी रुग्णालय ते चुनाभट्टी चौक हा देवनगरातील रस्ता आदींसह अनेक रस्त्यांवरून जाताना वाहन चालकांना हाच अनुभव येतो.
बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्याची जबाबदारी वाहतूक पोलीसही विसरून गेले आहेत. वाहतूक पोलिसांचे दर्शन अनेक ठिकाणी होत असले तरी ते केवळ चलान कापण्यासाठीच उभे असतात. लाल दिवा असतानाही अनेक दुचाकीस्वार बेधडक तो धुडकावून पुढे निघून जातात. त्यांना पोलिसांची भीती का वाटत नाही, याचे कारण पोलीसही जाणतात. शहरात वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला असून वालीच नसल्याने वाहतूक सैरभैर झाली आहे. वाहतूक पोलीस वाहतूक नियमनाबाबत निष्काळजी झाले का, असा प्रश्न जनतेला पडला आहे.