आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर समाजाला समाविष्ट करण्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानासह विविध आदिवासी संघटना, विद्यार्थी संघटना यांच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. डफच्या तालावर काहींनी केलेले पारंपरिक नृत्य तर काहींनी जनजागृतीसाठी घेतलेला लोककलेचा आधार यामुळे मोर्चाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
राज्य शासन आदिवासी जमातीत धनगर व इतर जातींच्या आरक्षणास पाठिंबा देऊन या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यास विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानने मोर्चाचे आयोजन केले होते. धनगर व इतर जाती आदिवासी होण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण करीत नाहीत. तसेच केंद्र शासनाने याबाबतची मागणी पूर्वीच फेटाळली आहे. राज्य शासनाने यापूर्वी प्रतिकूल मत नोंदवून पाठवलेला प्रस्ताव परत घेतला आहे. शिवाय धनगर समाजाला अनुसूचित भटक्या जमातीत ३.५ टक्के आरक्षण असताना आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याची जुनीच मागणी पुन्हा रेटली जात आहे. याचा फायदा काही स्वार्थी राजकारण्यांकडून होत असल्याचा आरोप अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, गडचिरोली, चंद्रपूर, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर आदी भागांतून आदिवासी समाजातील ४५ जमातींचे नागरिक सहभागी झाले.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून मोर्चा शालिमार, महात्मा गांधी रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आरक्षणास विरोध, वस्तुस्थिती काय या विषयी प्रबोधन करण्यात आले. आरक्षणास विरोध करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यासोबत फलकही झळकविण्यात आले. पारंपरिक वेशभूषेसह ढोल-ताशे, विडंबनात्मक चित्ररथ मोर्चात सहभागी झाले. शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी पिचड यांच्यासह प्रा. अशोक बागुल, रवींद्र तळपे, डॉ. मुरलीधर वाघेरे आदी उपस्थित होते.

मोर्चेकऱ्यांचा आधार
दुपारच्या रणरणत्या उन्हात शहरातील मध्यवर्ती भागातून जोरदार घोषणा देत निघालेल्या मोर्चात पुरुषांसह महिलाही मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. तळपत्या उन्हात मुलां-बाळांसोबत चालताना आदिवासी बांधवांना आधार राहिला तो बिसलरीच्या पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटचा. अखेपर्यंत मोर्चेकऱ्यांचा उत्साह टिकून राहावा याची दक्षता आयोजकांनी घेतली की खुद्द मोर्चात सहभागी झालेल्यांनी ही बाब मात्र स्पष्ट झाली नाही.

विडंबनात्मक चित्ररथ
धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी धनगरांचा समावेश आदिवासी जमातीत करावा अशी मागणी विधानसभेत केली होती. त्यांच्या मागणीची मोर्चेकऱ्यांनी खिल्ली उडवत एका फलकावर व्यंगचित्र काढून नामोल्लेख न करता ‘अपरिपक्व नेता’ असे संबोधले होते. अभ्यास शून्य, राजकीय पदासाठी आसुसलेले असा त्यांचा उल्लेखही करण्यात आला.