कायद्याचा अभ्यास करून नायलॉन मांज्याच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी नेचर क्लब ऑफ नाशिकच्या शिष्टमंडळाला दिले. नेचर क्लबतर्फे नायलॉन मांज्याच्या बंदीसाठी अभियान सुरू करण्यात आले असून अभियानाचा एक भाग म्हणून आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
दोन वर्षांत नायलॉन मांज्यामुळे ६२ गवाणी घुबड, १७ घार, ३५ बगळे, चार कोकिळा, २७ पानपक्षी, एक गिधाड, जखमी अवस्थेत सापडले तर ३५ पक्षांना जीव गमवावा लागला. हा धागा कुजत नसल्याने तो वर्षभर झाडावर लटकून राहतो. त्यामुळे पक्ष्यांचे जीवनचक्र नष्ट होत आहे. काही दुर्मीळ पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. तसेच वर्षभरात अनेक नागरिक मांज्यामुळे जखमी झाले असून काहींचा गळा, हात, पाय कापले गेल्याने जखमा झाल्या. या मांज्यावर बंदी आणावी म्हणून संस्थेच्या वतीने विदर्भ पक्षीमित्र साहित्य संमेलनात चर्चा घडविण्यात आली.
मांज्यावर बंदी आणण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. पक्षी व मनुष्यासाठी घातक ठरणारा नायलॉन मांज्याची विक्री करू नये, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत ज्येष्ठ पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ, नेचर क्लबचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, लायन्स क्लबचे उपप्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव आदींनी सहभाग घेतला.