विजेची उपलब्धता कमी असतानाही सांगली जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात उभारण्यात आलेल्या सुमारे दोनशे पवनचक्क्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गेली दीड महिन्यापासून बंद आहेत. कोटय़वधी रुपयाची गुंतवणूक करणा-या कंपन्यांनी या ठिकाणच्या पवनचक्क्या खाजगी गुंतवणूकदारांना देऊन कमाई केली असली, तरी गुंतवणूकदार आंदोलनामुळे आíथक कोंडीत सापडले असून ही कोंडी फोडण्यास प्रशासनही हतबल झाले आहे.
तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावर मोठया प्रमाणात पवनऊर्जा प्रकल्पांतर्गत पवनचक्क्या उभरण्यात आल्या आहेत. पळसी, हिवरे, घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, ढालगाव, नागज आदी परिसरात असणा-या डोंगर माथ्यावर सुझलॉन व इनरकॉन कंपनीने कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक करून पवनचक्क्या उभारल्या आहेत. पवनचक्की उभारत असताना शेतकऱ्यांकडून अल्पमोबदल्यात जमिनी घेतल्या असल्याची भूमिपुत्रांची मागणी आहे. या जमिनीसाठी योग्य दर देत असताना भूमिहीन होणा-या शेतकऱ्यांना रोजगार देण्याची तयारी कंपन्यांनी दर्शविली होती. मात्र एकदा कार्यभाग साधताच कंपनीने दिलेले आश्वासने लेखी नसल्याचे कारण दाखवित रोजगार देण्यास असमर्थता दर्शविली. कामावर घेण्यात आलेल्या भूमिहीन शेतकऱ्यांना सुरक्षा रक्षकाचे काम देण्यात आले होते. त्या कामावरूनही ५०० तरुणांना बेदखल करण्यात आले आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी राजकीय कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने या परिसरातील २०० पवनचक्क्या बंद केल्या आहेत.
प्रत्येक पवनचक्कीकडून वा-याचा कमाल वेग असेल तर २४ तासांत १२५० किलोवॉट ऊर्जा निर्मिती होऊ  शकते. गेल्या दीड महिन्यापासून २०० पवनचक्क्यांची पाती बंद असल्याने दररोज सुमारे २५० मेगावॉट वीज उत्पादन थांबले आहे.  ज्या गुंतवणूकदारांनी पवनचक्क्यांसाठी गुंतवणूक केली आहे. त्यांनी प्रशासनाकडे या संदर्भात दाद मागण्याचा प्रयत्न केला.  तोडगा काढण्यासाठी मिरजेच्या प्रांताधिकारी श्रीमती स्मिता कुलकर्णी यांनी संबंधितांची बठकही आयोजित केली. मात्र यातून तोडगा निघू शकला नाही.  ग्रामपंचायत स्तरावरील कर भरण्यास कंपन्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत गावपातळीवरील पदाधिकारीही आंदोलकांच्या बाजूने उभे राहिल्याने दीड महिन्यापासून हा प्रश्न प्रलंबित आहे.