सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा व वाहतूक नियंत्रण शाखेला गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल आय.एस.ओ. ९००१:२००८ चे आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सोलापूर पोलीस दलाच्या इतिहासात अशा प्रकारचे गुणवत्ता प्रमाणपत्र प्रथमच मिळाले असून या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या सेवेचा दर्जा सुधारण्यास आणखी वाव मिळणार आहे.
सेवा व व्यवस्थापनात गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि त्याचा लाभ समाजातील घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध औद्योगिक व सेवा क्षेत्रातील आस्थापनांना जागतिक गुणवत्तेचे प्रमाणपत्र मिळते. शासकीय आस्थापनांनीही आता आपली गुणवत्तापूर्ण सेवा तथा व्यवस्थापनाचा दर्जा वृद्धिंगत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र दिसते. महाराष्ट्र पोलीस दलानेही आधुनिक गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून मुंबई, औरंगाबाद, सांगली आदी ठिकाणी पोलीस दलाने जागतिक गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविले आहे. त्यानंतर सोलापूर शहर गुन्हे शाखा व वाहतूक शाखेला जागतिक गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा बहुमान मिळाला आहे.
शहर गुन्हे शाखेने गुन्ह्य़ाचे अभिलेख अद्ययावत ठेवत असताना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. देशभरात राबविण्यात येणाऱ्या सीसीटीएनएस (गुन्हे, गुन्हेगार शोध कार्यप्रणाली पध्दती) प्रकल्पात महाराष्ट्रात सोलापूरची कामगिरी अग्रेसर ठरली आहे. राज्यात सर्वाधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सीसीटीएनएसचे प्रशिक्षण शहर गुन्हे शाखेमार्फत देण्यात आले आहे. गुन्हे उघडकीस आणणे व बेपत्ता व्यक्तींना शोधण्यासाठी सायबर शाखेने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. अनेक वर्षांपासून फरारी असलेले ४२ आरोपींना सायबर शाखेच्या माध्यमातून पकडण्यात आले आहे. गुन्हे तपासात ‘मोबाइल ट्रेसिंग’चा उपयोग करून आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आयएसओ प्रमाणपत्रासाठी ‘ए टू झेड क्वालिटी सर्टिफिकेशन प्रा. लि.’ ने सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.
गुन्हे शाखेप्रमाणे सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखेच्या कार्यालयासाठीही वाहतूक लोकशिक्षण आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या आधुनिकीकरणाबद्दल जागतिक गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे. शाळा व महाविद्यालयातील १८७० विद्यार्थी रस्ता सुरक्षा दलाच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. यशिवाय ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रा, लोकमंगल प्रतिष्ठान आयोजित सामूहिक विवाह सोहळा, सोलापूर इलेक्ट्रो प्रदर्शन व अन्य माध्यमातून एकत्रित जनसमुदायाला वाहतुकीविषयी प्रबोधनपर परिसंवाद व सीडीद्वारे लोकशिक्षण दिले जाते. वाहतूक नियंत्रण शाखेत ट्राफिक क्रॉप योजना, मनुष्यबळ वाढ, २८ नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी पाठपुरावा, महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाहतूक नियमनासाठी दहा टक्के निधीची तरतूद करावी व निधीचा विनियोग वाहतूक शाखेच्या सूचनेनुसार होण्यासाठी प्रयत्न आदी बाबी जागतिक गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी उल्लेखनीय ठरल्या. आशिया पॅसिफिक क्वालिटी ऑर्गनायझेशनने (फिलिपाईन्स) आपल्याशी संलग्न असलेल्या एसजी सर्टिफिकेशन्स प्रा. लि. (नोएडा) या संस्थेने गुन्हे शाखा व वाहतूक शाखेच्या कामकाजाची माहिती घेऊन व समक्ष चौकशी करून हे जागतिक गुणवत्ता प्रमाणपत्र बहाल केले आहे. हे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेली गुणवत्तापूर्ण सुधारणा, सेवा व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग महत्त्वाचा असून त्यासाठी पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, स्मार्तना पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन कौसडीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. सहायक पोलीस आयुक्त बाहेती यांनी यापूर्वीही औरंगाबाद येथे सेवेत असताना तेथील सिटी चौक पोलीस ठाण्याला जागतिक गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी महत्त्वाचा पुढाकार घेतला होता.