यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने समाजातील अत्यंत दुर्लक्षित राहिलेल्या घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली आहे. आता विद्यापीठाने शिक्षणाबरोबर समाजातील वंचित घटकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल डॉ. के. शंकरनारायणन यांनी केले. मुक्त विद्यापीठाच्या दिनदर्शिकेचे उद्घाटन राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
मुंबई डबेवाले, रेल्वे स्थानकांवर बूट-पॉलिश करणारे, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षा-टॅक्सी वाहनचालक, केश कर्तनालयातील कामगार, यंत्रमाग कामगार, आदिवासी भागातील युवक, गॅस सिलिंडर वितरित करणारे युवक अशा शिक्षणापासून दूर असलेल्या समाज घटकांकरिता मुक्त विद्यापीठाने विविध शिक्षणक्रम विकसित केले आहेत. या शिक्षणक्रमाची माहिती, छायाचित्रे व लाभार्थी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया असलेले कल्पक व आल्हाददायक असे ‘टेबल टॉप’ दिनदर्शिका मुक्त विद्यापीठाने प्रसिद्ध केली आहे. या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा डॉ. के. शंकरनारायणन यांच्या हस्ते झाला.
या वेळी कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांनी ही दिनदर्शिका म्हणजे मुक्त विद्यापीठाने काय साध्य केले आहे ते इतरांना सांगण्याचा प्रयत्न नाही, तर हे विद्यापीठ कोणत्या मूल्यांवर काम करीत आहे, त्याचे आम्ही आम्हालाच दिलेले हे एक स्मरणपत्र असल्याचे नमूद केले. या वेळी त्यांनी मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या जीवनात झालेल्या बदलाचा वेध घेतला. मालेगावमधील यंत्रमाग कारागिरांचे स्वत:च्या घरांचे स्वप्न महापालिकेच्या मदतीने साकार होत आहे. हे विद्यापीठ बदल घडविणारे विद्यापीठ असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सहयोग व विशेष उपक्रम विभागाच्या संचालिका डॉ. अनुराधा देशमुख, ग्रंथनिर्मिती केंद्राचे प्रमुख आनंद यादव, संस्थात्मक   संप्रेषण विभागाचे प्रमुख निवास बेलसरे, दृकश्राव्य विभागाचे संतोष साबळे आदी उपस्थित होते.