सांगली जिल्हा परिषदेच्या ४ सभापतींच्या निवडी बुधवारी बिनविरोध करण्यात आल्या. आटपाडीच्या मनीषा पाटील यांनी महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद नाकारल्याने शिराळ्याच्या वैशाली नाईक यांना संधी देण्यात आली.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर दोन विषय समित्या आणि समाजकल्याण व महिला बालकल्याण समिती सभापतींच्या निवडीसाठी आज जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात पीठासीन अधिकारी श्रीमती स्मिता कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आज चौघांच्या निवडी करण्यात आल्या. विषय समितींच्या सभापतिपदी दत्ताजीराव पाटील (कवठेमहांकाळ), राजेंद्र महादेव माळी (मिरज), समाजकल्याण सभापतिपदी किसन जानकर (खानापूर) आणि महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती वैशाली नाईक (शिराळा) यांच्या बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या.
तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष सदस्यांची बठक पक्षाच्या कार्यालयात झाली. िशदे यांनी चौघांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी महिला व बालकल्याण समितीसाठी मनीषा तानाजी पाटील या आटपाडीच्या महिला सदस्यांना संधी देण्यात येत असल्याची घोषणा शिंदे यांनी केली. मात्र त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला.  शिंदे यांनी पक्षाचे नेते जयंत पाटील व आर. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती कथन केली. त्यानंतर या पदासाठी वैशाली नाईक यांना संधी देण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यानंतर सर्व चारही सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज पिठासीन अधिकारी श्रीमती कुलकर्णी यांच्याकडे सादर केले.
जिल्हा परिषदेत ६४ पकी ३६ सदस्यांचे संख्याबळ राष्ट्रवादीकडे असल्याने काँग्रेसने या निवडीला कोणताही आक्षेप घेतला नाही आणि उमेदवारीही दाखल केली नाही. त्यानंतर झालेल्या बठकीत या निवडी बिनविरोध होत असल्याची घोषणा श्रीमती कुलकर्णी यांनी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे हे उपस्थित होते. नूतन सभापतींच्या निवडीनंतर जिल्हा परिषद आवारात गुलालांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी मोठय़ा प्रमाणात कार्यकर्त्यांनी केली.