गोंदिया जिल्हा परिषदेत सोमवारी विषय समितीच्या सभापतीपदाची निवडणूक  गोंधळलेल्या परिस्थितीत झाली. रुसवे-फुगवे, शिवीगाळीचे  राजकारण होत अखेर भाजपने यश मिळविले. सभागृहातील परिस्थिती तर अशी होती की, चार नावांवर तर अखेरच्या क्षणी सहमती घडवून आणत भाजपने यश मिळविले. या निवडणुकीत केशोरीचे प्रकाश गहाणे यांनी राष्ट्रवादीचे बाळकृष्ण पटले यांचा ५ मतांनी पराभव करून कृषी व पशुसंवर्धन पद काबीज केले. अर्थ व बांधकाम सभापतीपदी भाजपचे गणखैराचे मोरेश्वर कटरे यांनी कॉंग्रेसच्या संदीप भाटीया यांचा पराभव केला. महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी भाजपच्या पुराडाच्या सविता पुराम यांनी कॉग्रेसच्या मीना सोयाम यांचा पराभव केला, तर समाजकल्याण सभापतीपदी कुशन घासले यांनी राष्ट्रवादीचे मीलन राऊत यांचा पराभव केला. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना २८, तर पराभव पत्करलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना २३ मते मिळाली. प्रत्येक विजय सभापतीनी ५ मतांच्या फरकाने विजय मिळविला.
या निवडणुकीकरिता भाजपने आपल्या अनेक गटांना प्रतिनिधित्व मिळावे, याकरिता मोच्रेबांधणी केली होती. शेवटी अपयश मिळत असल्याचे पाहून भाजपच्या १२ सदस्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत हातमिळवणी करून भाजपचे चार सभापतीपदाचे मनसुबे उधळण्याचा डाव आखला होता, पण शेवटच्या क्षणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी बंडखोरी करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या पक्षनेत्यांशी बोलणी करून त्यांना माघार घेण्यात यश मिळविले खरे. पण निवडणूक झाल्यानंतर भाजपचे सभापतीपदाचे दावेदार असलेले राजेश चतुर हे फारच नाराज होऊन सभागृहाबाहेर पडले. जातीवाचक शब्दांचा प्रयोग करीत त्यांनी आमचा गेम केला असल्याची खंत माध्यमांसमोर बोलून दाखविली, तसेच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वरिष्ठांचे आश्वासन मिळाल्यानंतर आश्वस्त असलेले शिवसेनेचे एकमात्र सदस्य असलेले राजेश चांदेवार यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबाबत आपला रोष व्यक्त केला.
जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांना प्रतिनिधित्व देण्याच्या बेतात गोंदिया तालुक्याचे रिकामे हात ठेवण्यात भाजपच्या वरिष्ठांना यश लाभले. त्या मोबदल्यात गोरेगाव तालुक्याला दोन सभापती पदे देण्यात आली. या निवडणुकीत भाजपच्या प्रत्येक गटाने वर्चस्व राखण्यासाठी खालची पातळी गाठली. निवडणुकीनंतर सभागृहाबाहेर भाजपचे गोरेगावचे खोमेश रहांगडाले यांचे पुत्र पंकज रहांगडाले भाजपचे माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्यावर धावून गेले. पोलिसांनी परिस्थिती हाताळून अनर्थ होऊ दिला नाही, पण रहांगडाले यांनी माजी उपाध्यक्षांना शिवीगाळ केल्याने भाजपचे अंतर्गत मतभेद उफाळून आल्याचे प्रकर्षांने जाणवले.