१८ बाय २० फुटांच्या रंगमंचापासून ७० एमएम पडद्यापर्यंत प्रत्येक व्यासपीठावर आपल्या अनोख्या अभिनयाने एक वेगळाच ठसा उमटवणाऱ्या वंदना गुप्ते आता दिग्दर्शिका म्हणून समोर येणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती त्याच करीत आहेत. या चित्रपटाचे संवादलेखन सुरू झाले आहे.
गेली चार पाच वर्षे माझ्या डोक्यात एक विषय घोळत होता. हा विषय आपणच मांडावा, असेही वाटत होते. त्यामुळे मग स्वत:च दिग्दर्शनाचा निर्णय घेतला. आता या क्षेत्रात एवढी वर्षे मुशाफिरी केल्यानंतर हा निर्णय आपण घेतल्याचे वंदना गुप्ते यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.
मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत ग्रामीण पाश्र्वभूमीचे अनेक चित्रपट आले. या चित्रपटांना व्यावसायिक यशही मिळाले. मात्र तरीही कुठेतरी मराठी चित्रपटांतून मराठी मातीचा गंध हरवत चालल्यासारखे वाटते. ‘साधी माणसं’, ‘तांबडी माती’, ‘मोहित्यांची मंजुळा’ अशा चित्रपटांमध्ये असलेला मराठी स्वाद आपल्या चित्रपटातून मिळेल, असे गुप्ते यांनी सांगितले. आपली कथाही गावात घडणारी, खूप साधी सरळ आणि कुटुंबव्यवस्थेबद्दलची आहे. अशा गोष्टी मराठी लोकांना नेहमीच आवडत आलेल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या या चित्रपटाच्या संहितेवर काम सुरू आहे. त्यासाठी एक व्यक्ती वंदना गुप्ते यांना मदत करत आहे. मात्र ही व्यक्ती कोण आहे, याबाबत त्यांनी आत्ताच काही सांगण्यास नकार दिला. संहिता शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय आपण चित्रिकरण सुरू करणार नाही. त्यामुळे साधारणपणे ऑगस्टमध्ये सर्व प्रक्रिया सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.