‘उंच माझा झोका’ या मालिकेत विक्रम गायकवाडने न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची भूमिका अभिनयातून अक्षरश: जिवंत केली. मालिकेला अमाप लोकप्रियता तर मिळालीच; पण विक्रमनेही आपला स्वतंत्र ठसा या भूमिकेवर उमटविला. ही भूमिका एका उंचीवर नेल्यानंतर विक्रम आता ‘वासूची सासू’ या नाटकातील ‘वासू’च्या भूमिकेतून रसिकांपुढे येत आहे     आशय प्रॉडक्शन निर्मित अनुराधा वाघ सादर करत असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन मंगेश कदम करत आहेत. काही वर्षांपूर्वी रंगभूमीर गाजलेल्या या नाटकाचे पुनरागमन होत आहे. २५ ऑक्टोबर रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होत आहे. दिलीप प्रभावळकर यांची भूमिका प्रणव रावराणे करीत आहे.
न्यायमूर्ती रानडे या गंभीर भूमिकेनंतर ‘वासू’च्या एकदम वेगळ्या भूमिकेकडे कसा काय वळला, असे विचारले असता विक्रम म्हणाला,  ‘माधवराव’ही भूमिका माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली. मात्र एकाच प्रकारच्या भूमिका करण्यापेक्षा वेगवेगळ्या भूमिका कराव्यात, या उद्देशाने मी ‘वासू’ची भूमिका स्वीकारली. गंभीर भूमिकेपेक्षा, त्या भूमिकेतून प्रेक्षकांना रडविण्यापेक्षाही हसविणे अधिक अवघड आहे, असे मला वाटते. त्यामुळे एक आव्हान म्हणून मी या नव्या भूमिकेकडे पाहतो आहे.
‘उंच माझा झोका’ मधील माझी भूमिका मी ज्या वयाचा नाही, त्या वयातील होती. इथे नाटकात ‘वासू’ची भूमिका करणे तुलनेत अधिक सोपे जात आहे. मी आत्ता ज्या वयाचा आणि पिढीचा आहे, तोच मी नाटकात आहे. दुसरे असे की मालिकेपेक्षा रंगभूमीवर काम करणे मला जास्त आव्हानात्मक वाटते. प्रेक्षकांसमोर अडीच ते तीन तास तुम्हाला ‘लाइव्ह’ सादरीकरण करायचे असते.
यापूर्वी पुण्यात ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या व्यावसायिक नाटकातून काम केले होते. पण मुंबईत व्यावसायिक रंगभूमीवर आणि मंगेश कदम यांच्या सारख्या मातब्बर दिग्दर्शकाबरोबर पहिल्यांदाच काम करत असल्याचे विक्रम म्हणाला.