घोटीपासून जवळ असलेल्या शेनवड बुद्रुक येथील लघू पाटबंधाऱ्यास लगतचे शेतकरी आणि वीटभट्टी उत्पादकांकडून अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. शेती आणि वीट व्यवसायासाठी या पाटबंधाऱ्याच्या पात्रात मातीचा भराव टाकला जात असून या बाबीकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने या धरणातील पाणीसाठा घटला आहे. दरम्यान, याबाबत पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता डी. एस. ढोमसे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत अतिक्रमण करणाऱ्या शेतकरी आणि वीटभट्टी व्यावसायिकांची पाठराखण केली.
घोटीपासून हाकेच्या अंतरावर शेनवड बुद्रुक हा लघुपाटबंधारा असून या बंधाऱ्याची दुरुस्ती आणि देखभालीकडे पाटबंधारे विभागाने अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे. वीट उत्पादक व्यावसायिकांनी थेट धरणाच्या पात्रात मातीचा भराव टाकून पात्र छोटे केले आहे; तर एका शेतकऱ्यानेही बंधाऱ्याच्या पात्रात भराव टाकून शेतीसाठी वापर सुरू केला आहे. या बंधाऱ्याच्या पाण्यावर देवळे गावापर्यंतच्या सिंचनाची मदार आहे. परंतु पात्रात भराव टाकल्याने बंधाऱ्यातील पाण्याची क्षमता घटली आहे, तर दुसरीकडे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे आणि देखभालीकडे पाटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याने बंधाऱ्याचा कालवा नष्ट झाला आहे. पाणी सोडण्याचे यंत्र नादुरुस्त झाल्याने पाण्याचा विसर्ग करता येत नसल्याने बंधाऱ्याखालील शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन धरणाची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी सक्षम अधिकारी नेमावेत, अशी मागणी होत आहे.
अतिक्रमण झाल्याची तक्रार द्या, त्यानंतर चौकशी करू आणि दोषी असल्यास कारवाई करू. वीटभट्टी चालकांनी अतिक्रमण केले अशी तक्रार आली होती. मात्र त्यांनी आपली जागा असल्याचे सांगितल्याने पुढील चौकशी केली नाही, असे मुकणे धरण शाखा अभियंता ढोमसे यांनी सांगितले.