वांद्रे-डेहराडून एक्स्प्रेसला ८ जानेवारी २०१३ रोजी लागलेल्या आगीचे कारण अद्याप अनुत्तरीतच आहे. कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून या संदर्भातील अहवाल तयार करण्यात आला आहे. घटनास्थळावरून गोळा केलेले साहित्य, वस्तू आणि अन्य अवशेषांमध्ये स्फोटक/ज्वलनशील पदार्थ असण्याची शक्यता या अहवालात फेटाळून लावली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
डेहराडून एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना लागलेल्या या आगीत नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सिगरेट आदी ज्वलनशील पदार्थामुळे ही आग लागलेली नसल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गाडीच्या डब्यांना कोणत्या कारणामुळे आग लागली हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे.