आपल्या आजी-आजोबांना काय भेट द्यायची असा विचार करत असताना आपल्या मनात त्यांचे कपडे, त्यांना आवश्यक असलेली काठी आदी गोष्टी येतात. पण सोमय्या महाविद्यालयात शिकत असलेल्या सोमिल शाह याने मात्र आजोबांना थेट एक अनोखी भेट दिली ती म्हणजे स्वत: तयार केलेली एक व्हीलचेअर. ही व्हीलचेअर सामान्य व्हीलचेअरसारखी नाही. तर हिच्या साहाय्याने जिन्यावरही चढउतार करता येते.
अपंगांना अनेकदा व्हीलचेअरचा आवश्यक असते. पण ही व्हीलचेअर सर्वच ठिकाणी नेणे शक्य नसते. अनेक ठिकाणी पायऱ्या आल्या की त्यांना कुबडय़ांचा आधार घ्यावा लागतो. स्वाभाविकच सोबतच्या व्यक्तीला ती व्हीलचेअर उचलून घ्यावी लागते. असाच काहीसा त्रास सोमिल याच्या आजोबांना होत होता. त्यांना व्हीलचेअरची गरज भासत असे. व्हीलचेअरचा वापर करून पायऱ्यांवरून चढ-उतर करणे त्यांना शक्य होत नव्हते.
त्यावेळी सोमिल अकरावीत होता. त्याने यावर काहीतरी उपाय शोधून काढायचाच असा ध्यास घेतला आणि तो कामाला लागला. अनेक जणांशी त्याने भेटीगाठी केल्या अखेर त्याने ‘स्टेअर क्लायिम्बग व्हील चेअर’ कल्पना विकसित करून त्यावर काम सुरू केले. त्याच्या या कामाला त्याचे कनिष्ठ महाविद्यालय ‘स्वाध्याय भुवन’मधील शिक्षकांनीही मदत केली. सध्या तो के. जे. सोमय्या महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांत शिकत असून त्याने पायऱ्या चढणारी आणि उतरणारी अनोखी व्हीलचेअर यशस्वीपणे तयार केली आहे.
यासाठी त्याने सामान्य व्हीलचेअरला पायरी उतरताना आधार देणारी दोन अतिरिक्त चाके दिली आहेत. ही चाके थोडय़ा जास्त उंचीवर असून ती पायऱ्यांवर व्हीलचेअर चालवत असताना आधार देण्याचे मुख्य काम करतात. सोमिलच्या या प्रयोगाला विविध ठिकाणी सन्मान मिळाला आहे. सोमय्या ट्रस्टच्या रुग्णालयातही ही व्हीलचेअर वापरण्याचा प्रयत्न असून यासाठी पुढील काम सुरू असल्याचे सोमिलने सांगितले.
सोमिलची कल्पक बुद्धी एवढय़ावरच थांबली नाही. त्याने गरीब शेतकऱ्यांसाठी गवत कापणारी एक सायकल तयार केली आहे. अनेक शेतकऱ्यांना महागातील गवत कापणारे मशीन घेणे शक्य नसते. अन्यथा ते हाताने गवत कापतात. अशा शेतकऱ्यांसाठी सोमिलने एक सायकल तयार केली आहे. ही साधी सायकल असून तिला त्याने गवत कापणारी यंत्रणा बसवली आहे. ही सायकल आपण गवताच्या भागातून फिरवल्यावर गवत कापले जाते आणि ते एका पोत्यात जमा होते. ज्यावेळेस गवत कापायचे नसेल त्यावेळेस यंत्राचा भाग काढून ठेवला साधी सायकल म्हणून ती वापरता येते, असे सोमिल सांगतो.