सुनीता विल्यम्सने उलगडले अंतराळातील अनुभव
‘मी अंतराळातून पृथ्वीवर आले की, मला घरी आल्यासारखे वाटते’, असे सांगून अंतराळ विरांगना सुनीता विल्यम्स हिने आपले अंतराळातील अनुभव, विद्यार्थ्यांसमोर गुरुवारी उलगडले.. निमित्त होते माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्यातर्फे तिच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधलेल्या संवादाचे!
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनीताने विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या विविध विषयांवरील प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अधिष्ठाता राहुल कराड, एमआयटी स्कूल ऑफ बिझिनेसचे संचालक डी. पी. आपटे, प्राध्यापक अंजली वांबूरकर उपस्थित होते. यावेळी पुण्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी उपस्थित होते.
‘वेगवेगळ्या क्षेत्रांकडे पाहा, ती समजून घ्या. पण त्यातून तुम्हाला आवडते, त्याच क्षेत्रात काम करा,’ असा सल्ला विद्यार्थ्यांना देऊन सुनीता विल्यम्स म्हणाल्या, ‘‘अंतराळवीरांगना होणे हे माझे स्वप्न होते, ते पूर्ण झाले. अंतराळ मोहिमेदरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देता यावे, यासाठी आम्हाला स्वत:मध्ये नेतृत्व गुण विकसित करावे लागतात. निसर्ग आणि जीवन यासंबंधीचे नियम पृथ्वीपेक्षा अंतराळात वेगळे असतात. या सर्वाला तोंड देण्यासाठी आम्हाला अतिशय खडतर प्रशिक्षणातून जावे लागते. अंतराळ मोहीम यशस्वी होते त्यावेळी वेगळेच समाधान मिळते.’’ आपल्या भविष्यातील योजनांबाबत सुनीता विल्यम्स यांनी सांगितले, ‘‘अंतराळ मोहिमा अधिक सोप्या व्हाव्यात यासाठी अनेक संशोधने सध्या सुरू आहेत. सध्या पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये जाण्यासाठी काही दिवसांचा वेळ लागतो, तो काही तासांवर यावा यासाठी आम्ही नव्या स्पेस क्राफ्टची रचना करत आहोत, या विषयावर संशोधन सुरू आहे.’’
स्त्री-पुरुषांना समानतेने वागणूक मिळावी
स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या पाश्र्वभूमीवर सुनीता विल्यम्स यांना विचारले असता, त्यांनी सांगितले, ‘‘माझ्या करीअरकडे मी कधी स्त्री म्हणून पाहिले नाही आणि मला असं कधी पाहावे लागलेही नाही. स्त्री आणि पुरुषांना समानतेने वागवले पाहिजे, जेणेकरून स्त्रियांवरील अत्याचार टाळता येतील.’’