गेली दहा वर्षांहून अधिक काळ भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने मुंबईकर हैराण झाले आहेत. भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याने लहान मुलांचे मृत्यू झाल्यानंतर वारंवार हा विषय चर्चिला गेला आहे. पण भटक्या प्राण्यांच्या संदर्भातील ही समस्या आता केवळ तेवढय़ावरच मर्यादित राहिलेली नाही. तर गेल्या, विशेषत: चार वर्षांमध्ये मांजरींसंदर्भातील तक्रारींमध्येही मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याने आता या मांजरींच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सुमारे दोन वर्षांंमध्ये पालिकेकडे आलेल्या भटक्या कुत्र्यांच्या तक्रारींबरोबरच मांजरींच्या तक्रारींमध्येही वाढ झाल्याने आता पालिकेनेच या मांजरींच्या गळ्यात घंटा बांधावी, अशा आशयाचा प्रस्ताव स्वयंसेवी संस्थांनी सादर केला आहे. सध्या तरी केवळ कुत्र्यांच्याच संदर्भात मुंबई महानगरपालिकेतर्फे त्यांच्या नसबंदीची मोहीम राबवली जाते. भटक्या कुत्र्यांना मारून न टाकता नसबंदी करून त्यांना त्यांच्याच क्षेत्रात परत आणून सोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर पालिकेतर्फे कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. सध्या तरी मांजर किंवा इतर कोणत्याही प्राण्यांसंदर्भात पालिकेकडे अशी कोणतीही मोहीम नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी कुत्र्यांची अशीच गणना करण्यात आली होती. त्यालाही आता बराच काळ लोटला आहे. मात्र मांजरांच्या संदर्भात अशी कोणतीही गणना आजवर झालेली नाही. पालिकेला अशा प्रकारची मोहीम मांजरांच्या संदर्भात घ्यायची असेल तर त्या आधी त्यांची गणना करणे अनिवार्य असेल. जगभरात आजवर केवळ दोनच शहरांमध्ये अशा प्रकारे मांजरांची गणना करण्यात आली आहे. त्यात आपल्याकडील अहमदाबाद आणि फिलिपाइन्समधील मनिला या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन शहरांमधील स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेण्याचे सुचविण्यात आले आहे. या संदर्भात अधिक काम करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था उत्सुक असल्याचेही समजते.
दरम्यान, एका स्वयंसेवी संस्थेने मांजरींच्या गणनेसंदर्भात पालिकेला प्रस्ताव सादर केला असून त्या बाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.