मूल दत्तक घेण्याची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता एका नोटरीच्या कागदपत्रांवर सह्य़ा करून विधवा महिलेने आपले अडीच वर्षांचे बालक एका ७१ वर्षांच्या वृद्धेला दत्तक म्हणून दिले असल्याचा प्रकार कल्याण पूर्व भागात उघडकीला आला आहे. आपली चूक लक्षात येताच या महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर या महिलेला पुन्हा आपल्या तान्हुल्याचा ताबा मिळाला आहे.
कल्याण पूर्वेत राहणाऱ्या या महिलेला अडीच वर्षांचा मुलगा आहे. ही महिला मजुरी करून उपजीविका करते. याच परिसरात राहणाऱ्या एका ७१ वर्षांच्या आजीला या महिलेचे बाळ दत्तक घेण्याचा मोह झाला. या आजीला तीन मुली आहेत. त्या विवाह झाल्यानंतर निघून जातील. आपला सांभाळ करण्यासाठी वारस पाहिजे या विचारातून या आजीने मूल दत्तक घेण्याची शक्कल लढविली. या अनाथ महिलेने नोटरीच्या कागदपत्रांवर सह्य़ा करून आपले तान्हुले ७१ वर्षांच्या आजीला दत्तक देत असल्याचे लिहून दिले. या बदल्यात अनाथ महिलेला आजीकडून पुढील उपजीविकेसाठी २० हजार रुपयांचा परतावा देण्यात आला. आजीने तान्हुले ताब्यात घेतले. भरले घर मुलामुळे रिकामे झाले. त्यामुळे ही  महिला अस्वस्थ झाली. दोन दिवसांनी मूल आजीच्या घरात दिसेनासे झाले. अस्वस्थ अनाथ महिलेने शेजारी, समाजसेवकांना घडला प्रकार सांगितला. आपली चूक कबूल करून तिने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले.
दत्तक घेणाऱ्या आजीबाईला पोलिसांनी पाचारण केले. तिने थेट नोटरीचे कागदपत्र पोलिसांना सादर केल्यानंतर पोलीस आश्चर्यचकित झाले. पोलिसांनी आजीला त्या मुलाला आईच्या ताब्यात देण्यास सांगितले.
कासावीस झालेली आईने पुन्हा आपल्या पदरात घेतले. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले, दत्तक कायद्यानुसार ही प्रक्रिया पार पाडली नाही. मुलाचा ताबा पुन्हा आईकडे देण्यात आला आहे. याप्रकरणाची आम्ही चौकशी करीत आहोत. याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.